मोदी, भाजपचा विजय ही वाईट बातमी: चीन

Narendra modi, victory, china, bad news, Global times

नवी दिल्ली – भारतामधील विविध राज्यांत भारतीय जनता पक्षास (भाजप) मिळालेल्या विजयामुळे देशांतर्गत विरोधी पक्षांसहच आता थेट चीनच्या पोटांतही दुखू लागले आहे! भाजपला मिळालेले विजय ही चीनसाठी चांगली बातमी नसल्याचे मत “ग्लोबल टाईम्स’ या चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या मुखपत्रामधून व्यक्त करण्यात आले आहे.

भाजपच्या या विजयांमुळे आता जागतिक राजकारणात भारत “तडजोड’ करण्याची करणे अधिकाधिक अवघड बनले असून; या विजयांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशांतर्गत व जागतिक पातळीवरील कडक धोरण अधिक कठोर होईल, असे प्रतिपादन ग्लोबल टाईम्समधील एका लेखामध्ये करण्यात आले आहे. याचबरोबर, आता भारतात 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्येही भाजपलाच जय मिळेल, अशी शक्‍यताही ग्लोबल टाईम्सने वर्तविली आहे!

“नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आधीचे कोणालाही न दुखविण्याचे भारतीय परराष्ट्र धोरण बदलून अधिकाधिक राष्ट्रीय हित साधण्यासाठी इतर देशांबरोबरील वादग्रस्त मुद्यासंदर्भात स्पष्ट भूमिका घ्यावयास सुरुवात केली आहे. मोदी यांना पुढील निवडणुकीमध्ये जय मिळाल्यास भारताकडून सध्या राबविण्यात येणारे ठाम धोरणच पुढे सुरु राहिल. यामुळे इतर देशांमधील वादांमध्ये भारताकडून तडजोड केली जाण्याची शक्‍यता अधिक क्षीण होईल,” असे या लेखामध्ये म्हटले आहे.

याचबरोबर, मोदी यांच्याकडून अंमलात आणले जाणारे ठाम धोरण स्पष्ट करताना या लेखामध्ये भारतीय पंतप्रधानांनी भारत-चीन सीमारेषेवर तैनात असलेल्या भारतीय सैनिकांबरोबर दिवाळी साजरी केल्याच्या घटनेचेही उदाहरण दिले आहे.

“यासंदर्भात भारत व चीनमधील सीमारेषेच्या वादाचे उदाहरण पाहता येईल. या वादावर अद्याप कोणताही सर्वमान्य तोडगा निघू शकलेला नाही. मात्र सीमारेषेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांबरोबर दिवाळी साजरी करत मोदी यांनी त्यांचे ठाम धोरण दाखवून दिले. याचबरोबर, एकीकडे मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने रशिया व चीनबरोबरील संबंध अधिक विकसित करत “शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन’ संघटनेचा सदस्यदेश होण्यासाठी अर्ज केला; तर दुसरीकडे जपान व अमेरिकेबरोबरील लष्करी संबंध आणखी वाढवित धोरणात्मक समतोलही साधला. आशिया-प्रशांत महासागरामधील अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणास व विशेषत: दक्षिण चिनी समुद्रासंदर्भातील अमेरिकेच्या भूमिकेसही मोदी यांनी पाठिंबा दर्शविला,” असे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे.

“”मात्र मोदी हे “हार्डलाईनर’ असले; तरी अशा प्रकारची मानसिकता असलेल्या नेतृत्वाने एकदा निर्णय घेतल्यास त्यांच्यामधील कार्यक्षमता आणि कुशलता या गुणांमुळे, त्यांच्याकडून कोणत्याही विषयासंदर्भात इतरांबरोबर करण्यात आलेल्या चर्चेद्वारे मार्ग निघण्याची शक्‍यता जास्त असते. यामुळेच मोदी यांच्या कार्यकाळात भारत व चीनमधील मतभेदांवर तोडगा निघण्यासंदर्भात आम्ही आशावादी आहोत,” असे प्रतिपादन या लेखाच्या माध्यमामधून करण्यात आले आहे.

image_print
Total Views : 493

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड