msid-58096866,width-400,resizemode-4,kolhapur

लाजिरवाणे हुंडाबळी!!!

April 16 2017, 0 Comments
- शैलजा जोगल

सुदैवाने कोकणात जन्म झाल्यामुळे हुंड्याचा विषय कधी झालाच नाही. ना कुणाला देताना पाहिलं ना घेताना… ना कोकणात हुंड्यासाठी कुणाचा छळ पाहिला… ना कुणी बागायतदार किंवा त्याची मुलगी आत्महत्या करताना पाहिली… पण कोकण सोडला तर उर्वरित महाराष्ट्रात हुंड्याच्या झळा भयंकर दिसून येतायत…शुक्रवारी हुंड्यासाठी पैसे नाहीत म्हणून लातूरच्या भिसे वाघोलीतल्या शीतल वायाळ या शेतकऱ्याच्या २१ वर्षीय मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. वर्षभरापूर्वी याच गावातल्या मोहिनी पांडुरंग भिसे या शेतकऱ्याच्या मुलीने आत्महत्या केली. १५ दिवसांपूर्वी कोल्हापूरच्या आरती पाटील – सावकारने सुद्धा सासरच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून गळफास घेतला. आणखी किती हुुुंडाबळी घेणार आहोत? पोरीच्या बापाकडे भीक मागताना लाज नाही वाटत का या पापी माणसांना ? लग्नाचा अर्धा – अर्धा खर्च हा प्रकारच लोकांना तिकडे माहित नाही. सरकारकडे गळा काढून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी भांडणारे राजकारणी पाहिले, पण हुंडाबळी विरोधात भांडणारा राजकारणी पाहिला नाही. मराठवाडय़ातील भीषण वास्तवांपैकी एक ते म्हणजे बालविवाह…. आजही मराठवाड्यात ३० टक्के बालविवाह होतात… त्याला कारण पण आहे मुलीचं वय जसं वाढत तसं हुंडा वाढतो… गरिब शेतकरी जमिन गहाण ठेवत मुला-मुलीच्या लग्नासाठी कर्ज काढतात, नंतर हे कर्ज फेडता नाही आलं म्हणून आत्महत्या करतात… शेतकऱ्यांच्या मुली बापाला आपलं ओझं वाटू नये म्हणून आत्महत्या करतात… शीतलने आत्महत्येपूर्वी मराठा समाजातल्यया या प्रथांबद्दल लिहिलं. पण मराठा समाज नाही तर सगळ्या समाजात हुंडा हा वेगवेगळ्या स्वरुपात दिला आणि घेतला जातो.

DOWRY

मराठवाड्यातल्या काही मुली चांगल्या शिकतात, कलेक्टर – तहसिलदार होतात आणि लग्नात मात्र मान खाली घालून बापाला हुंडा देताना बघतात. कोकण सोडला तर उर्वरित महाराष्ट्रात लग्नात मुलीकडचे लोक घरातल्या चमच्यापासून ते सगळ्या वस्तू, घर, गाडी अशा खूप गोष्टी मुलाला रुखवत नावाने देतात. हा पण एक प्रकारचा हुंडाच आहे. मुलींना एवढचं सागांवस वाटतयं तुमच्या वडिलांचं तुमच्यावर प्रेम असतं, ते वाट्टेल ते करतात तुमच्या सुखासाठी, कर्ज काढतात,तुमचं लग्न करतात पण तुम्हाला लग्नचं करायच असेल तर लायकीच्या माणसासोबत करा. अशा वस्तू घेऊन तुमच्याशी लग्न करणारा माणूस तुमच्या कधीच लायकीचा नाही, ना तो तुम्हाला भविष्यात सुख देऊ शकतो. मराठवाडा, विदर्भात मुलींना गर्भात मारण्याचं प्रमाण पण जास्त आहे. महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ हजार मुलांमागे १०३७ मुली आहेत. बाकी मराठवाडा, विदर्भात मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा कमी आहे. शेतकऱ्यांना मुली देत नाही असा आरडा ओरडा असतो नेहमी. मुलीच नाहीत तुमच्याकडे तर देणार कुठुन? कोकणात मुलगी आणि बाप यांच्यात जे नातं पाहायला मिळतं ते दुसरीकडे कोणत्याच भागात पाहायला मिळालं नाही. कोकणातले लोक आपल्या मुलींना, घरातल्या स्त्रियांना कशा जपतात, वाढवतात, समाजात – घरात मानाचं स्थान देतात हे एकदा येऊन नक्की पाहा. प्रत्येक निर्णयात स्त्रियांना बरोबरीचं स्थान देतात… पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातल्या मुलींना सांगणं आहे लग्न करताना हुंडाच काय तर तुमच्या आई- वडिलांची ऐपत पाहून लग्न करा. समाज लग्नाला येतो, जेवतो आणि जातो. तुमच्या आई – बापाला ते कर्ज फेडावं लागतं… याचा विचार करा… मुलीच्या आई वडीलांना सांगण आहे की आपल्या पोटच्या पोरीला असं विकू नका… समाजातल्या या वाईट रुढी – परंपरांबद्दल आवाज उठवा, लढा… हताश होऊन आत्महत्या करु नका… माझ्या सावित्री, जिजाऊच्या लेकी एवढया कमजोर नाहीत हे जगाला दाखवून द्या…

150
image_print
Pin It
Total Views : 8596

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *