female-infanticide

म्हैसाळकडं जाताना…

March 8 2017, 0 Comments
संजय आवटे

म्हैसाळकडं जाताना

रात्रीचे बारा वाजलेत.
८ मार्च उजाडतो आहे.
आता सुरु होतील
सारे लखलख इव्हेंट
कानीकपाळी वाजू लागतील
शुभेच्छांचे मेसेज
टीव्हीवरच्या अँकर गोड हसतील
वर्तमानपत्रं ‘ती’ला आळवतील
अनेकींना पुरस्कार मिळतील
‘ती’चं वर्णन करताना
निवेदिका आवंढे गिळतील
सगळीकडं बोंबाबोंब होईल
ती, ती, ती आणि ती.
*****
अशावेळी फक्त शांतता आहे
माझ्या सभोवताली
म्हैसाळच्या दिशेनं निघालेली
माझी कार आणि मी
*****
मध्येच रस्ता सोडून
मातीत जातं चाक
आणि, मी घाबराघुबरा होतो
कोणी सांगावं,
इथं एखादा गर्भ पुरला असेल तर
जेसीबीला तरी कसा तळ लागणार?
या क्रौर्याचा…
शेवटी मशीनच ते
त्यालाही मर्यादा!
माणसाला नसल्या तरी

******

mhaisal

रात्र वाढू लागते
आणि मनातली भीतीही.
या पोरी उठल्या त्या गर्भातून
आणि, त्यांनी अडवला
माझा रस्ता,
तर… ???
*****

मला अंधारुन आलंय
आईच्या कुशीत जावं,
असं वाटतंय.
खरं म्हणजे थेट गर्भातच.
गर्भातली ती बाळाची पोजिशन
मला फार आवडते…
बायॉलॉजीच्या पुस्तकातली!
कसली भारी!
तिथं लिंग कसं दिसतं
या डॉक्टरांना?
गर्भातलं ते धिटुकलं बाळ
बाहेर यायला आसुसलेलं,
पण आईच्या पोटात
किती निर्धास्त, किती आश्वस्त…
पुस्तकातली ती आकृती बघून
मी म्हणायचो आईला…
माझ्या आक्कूलाः
‘मी असाच होतो ना गं
तुझ्या पोटात!
किती मस्त ना!’
आजी म्हणायची
‘भोपळ्यात बी आप्पूट…’
*****

अशा कोणत्याही आक्कूला समजलं
की त्या निर्दयी जेसीबीनं
उकरलेला गर्भ
म्हणजे तुझा संजू होता…
तुझी संजना होती…
तर काय होईल त्या आईचं?
की काहीच नाही होणार?
काहीही नाही होणार?
*****

मी निघालोय म्हैसाळला!
या रस्त्याखाली पुरली आहेत
अनेक मुलींची प्रेतं
नि, ती आणखी चिरडत
चाललोय मी वेगानं…
मला काहीच कळेनासं झालंय
*****

पाश तू म्हणाला होतास,
‘सब से खतरनाक होता है
सपनों का मर जाना’
मेघराजनं पहिल्यांदा
ही कविता मोठ्यानं वाचली
तेव्हा अंगावर काटा आला होता.
आज या वाटेवर फक्त बधीरता आहे
****
या पोरी जाग्या व्हाव्यात
आणि त्यांनी लावावी आग
या भवतालाला…
असं काहीतरी व्हायला हवं
नि त्यात जळायला हवं
माझ्यासकट
हे सगळं जग..
******

मला आता दिसतोय
चेहरा एकेका मुलीचा
माझ्या आयुष्यातल्या
प्रत्येकीचा…
आईचा, ताईचा,
बायकोचा, वहिनीचा,
मैत्रिणीचा, कामवाल्या मावशींचा
अगदी शाळेतल्या मैत्रिणीचाही
आणि, धाय मोकलून रडतोय मी!
तुम्ही वाचलात गं…
नसता वाचलात
तर मी काय केलं असतं?
माझं काय झालं असतं?
मला मिठी मारायचीय प्रत्येकीला
घट्ट मिठी.. खूप घट्ट…
तुम्ही वाचलात…
नि, आता मला तुम्हाला
नाहीए गमवायचं.
कुठं कुठं नाही जायचं
तुम्ही, मला सोडून!
*****

तेवढ्यात,
भलत्याच पोरी माझी वाट अडवतात
म्हैसाळच्या रस्त्यावर
रक्ताचे पाट दिसू लागतात
माझ्या पांढ-याशुभ्र गाडीवर
रक्ताचे डाग
माझ्या शर्टवर…
वाढतच चाललेत …
मला ग्लानी येते
*****

iwd-events

ड्रायव्हरच्या आवाजानं
जाग येते अर्धवट
‘सर, उठा
बारा वाजले.
महिला दिन आहे ना आज!
बायकोला काय मेसेज पाठवू
सांगा ना, सर.’
मी अर्धवट जागा होतो.
ड्रायव्हर म्हणत असतो,
‘सांगा ना सर
मेसेज कुठला पाठवू तिला?’
मी महिला दिनाचा मेसेज
त्याला टाइप करुन
देऊ लागतो!
ड्रायव्हर सांगतो,
‘बायको माहेरी गेलीय.
गरोदर आहे ती’
****

मी त्याच्या
लकाकणा-या डोळ्यांकडं
पाहू लागतो.
बाजूला या मुली
मध्येच त्या मुली
अंधार आणखी एकवटलेला
मला पुन्हा ग्लानी येते
म्हैसाळच्या दिशेनं
गाडी पुढे सरकते… !

happy-international-womens-day-2016-hd-wallpapers

 

02
image_print
Pin It
Total Views : 250

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *