इन्फोसिसला निलेकणींचा “आधार”

IT,Infosys chairman,nandan nilekani,Bangalore,Business,Narayan Murthy, Vishal Sikka

बंगळूर : इन्फोसिसच्या संस्थापकांपैकी एक आणि आधारकार्ड योजनेचे शिल्पकार नंदन निलेकणी यांनी अखेर इन्फोसिस संचालक मंडळाचे अकार्यकारी अध्यक्ष म्हणून गुरूवारी (ता.24) सूत्रे स्वीकारली. विशाल सिक्का यांच्या राजीनाम्यानंतर आठवडाभरात कंपनीच्या संचालक मंडळाने निलेकणींच्या नियुक्‍तीला मंजुरी दिली. मात्र याचवेळी सिक्कासह आणखी तीन संचालकांनी संचालकपदाचे राजीनामे दिले आहेत. मुख्य संस्थापक नारायण मूर्तींच्या आग्रहाप्रमाणे इन्फोसिसमध्ये सुशासन आणण्याबरोबरच संचालक मंडळातील पोकळी भरून काढण्याचे निलेकणींसमोर आव्हान आहे.

विशाल सिक्का यांच्या राजीनाम्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापनावर प्रश्‍न चिन्ह निर्माण झाले होते. मूर्तींच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे राजीनामा देत असल्याचे सिक्का यांनी म्हटले होते. यानंतर शेअर बाजारात इन्फोसिसच्या शेअरमध्ये मोठी पडझड झाली. ही पडझड रोखण्यासाठी नव्या नेतृत्व निवडीची प्रक्रिया गतीमान झाली. यामध्ये निलेकणींचे नाव आघाडीवर होते. समभागधारक आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांनी कंपनीची धुरा पुन्हा नंदन निलेकणी यांच्याकडे सोपवावी, अशी आग्रही मागणी केली होती. त्यातच निलेकणी यांनी दोन महिन्यांचा अमेरिकेचा दौरा पुढे ढकलल्याने त्यांची कंपनीत परतण्याची शक्‍यता बळावली होती.अखेर गुरूवारी संचालक मंडळाने निलेकणींच्या नियुक्‍तीवर शिक्कामोर्तब केले. निलेकणी यांनी यापूर्वी 2002 ते 2007 मध्ये मुख्य कार्यकारी पदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली होती. दशकभरानंतर त्यांनी पुन्हा कंपनीचे नेतृत्व स्वीकारले आहे.

निलेकणी यांची संचालक मंडळाचे बिगर कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. मात्र विशाल सिक्का, संचालक मंडळाचे अध्यक्ष आर. सेशाशाही, प्राध्यापक जेफ्री लेहमन, आणि प्राध्यापक जॉन इट्‌चेमेंडी यांनी राजीनामे दिले आहेत. निलेकणी योग्य नेतृत्व असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनी नव्याने भरारी घेईल, असा विश्‍वास व्यक्‍त करत सेशाशाही यांनी निलेकणी यांचे स्वागत केले. रवि वेंकटेशन यांनी संचालक मंडळाच्या सह अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ते संचालक मंडळावर कायम राहतील.

image_print
Total Views : 397

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड