कर्जमाफीसंदर्भात माहिती संकलित करण्याचे काम सुरू – मुख्यमंत्री

Maharashtra,helicopter, Devendra Fadnavis

मुंबई – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वखालील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचेही कर्ज माफ करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातील माहिती संकलित करण्याचे काम सुरू असल्याची माहिती आज (बुधवार) विधानसभेत दिली.

शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्यांबाबत आमदार शंभूराजे देसाई यांनी आज प्रश्‍नोत्तराच्या तासाअगोदर कर्जमाफीची मागणी केली होती. याबाबत मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिले. ते म्हणाले, “राज्यातील 31 लाख शेतकऱ्यांना कर्जाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी राज्यसरकार प्रयत्न करत आहे. कर्जमाफीबाबत राज्य सरकारची भूमिका सकारात्मक आहे. याबाबत मी आजच उत्तर प्रदेशचे मॉडेल काय आहे, याची माहिती घेण्याबाबत अर्थ सचिवांना सांगितले आहे.’

यावेळी विरोधकांच्या संघर्ष यात्रेची खिल्ली उडवत मुख्यमंत्री म्हणाले, “विरोधकांचा संघर्ष कशासाठी सुरू हे त्यांनाच माहित आहे. याबाबत मी काहीही भाष्य करणार नाही. राज्य सरकार भाजप सेनेच्या आमदारांच्या मागणीशी सहमत असून मी ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे.’ तामिळनाडूचा कर्जमाफीचा विषय वेगळा असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, “शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची की नाही हे उच्च न्यायालयाने सांगण्याची गरज नाही. राज्य सरकार वेगवेगळ्या राज्याचे मॉडेल काय आहे हे तपासत आहे. केंद्राने मदत दिली नाही, तर कर्जमाफी कशी करता येईल, ते पाहणार आहोत.’ यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट केले.

image_print
Total Views : 416

तुमची प्रतिक्रिया द्या

आपला ईमेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *

मराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | इंग्रजी अक्षरातून मराठी लिहा |  Write in English |  वर्चुअल किबोर्ड