पेट्रोल आणण्यास उशीर झाल्याने मित्राचा केला भोसकून खून

पेट्रोल आणण्यास उशीर झाल्याने मित्राचा केला भोसकून खून

नाशिक : सातपूरच्या शिवाजीनगर परिसरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीतील पेट्रोल संपल्याने तरुणाने त्याच्या मित्रांना फोन करून पेट्रोल आणण्यास सांगितले होते. मित्रांना पेट्रोल आणण्यास उशीर झाल्याच्या कारणावरून तरुणाने मित्रांना शिवीगाळ करून एकाच्या कानशिलातही लगावली. त्या रागातून मित्रांनीही त्यास मारहाण केली तर एकाने त्याच्याकडील धारदार हत्यार तरुणाच्या पोटात भोसकले. यात गंभीर जखमी तरुणाला मित्रांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान पहाटे त्यांचा मृत्यु झाला असून याप्रकरणी सातपूर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. तर दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एकाचा शोध सुरू आहे.

अमोल अशोक बागले (23, रा. शिवाजीनगर, सातपूर. मूळ रा. शहादा, जि. नंदूरबार) असे मृत तरुणाचे नाव आहे. सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल बागले हा औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीच्या वाहनावर चालक म्हणून कामाला आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास तो दुचाकीवरून घराकडे परतत होता. त्यावेळी सीएट कंपनीसमोर त्याच्या दुचाकीतील पेट्रोल संपले. त्यामुळे त्याने त्याच्या मित्रास फोन करून पेट्रोल आणण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्याचे तीन मित्र पेट्रोल घेऊन आले मात्र त्यांना येण्यास उशीर झाल्याच्या क्षुल्लक कारणावरून अमोल बागले याने त्यांना शिवीगाळ सुरू केली. तसेच, एकाच्या कानशिलातही लगावली. त्यामुळे संतापलेल्या त्याच्या तिघा मित्रांनी अमोल बागले यास मारहाण सुरू केली. तर एका मित्राने त्याच्याकडील धारदार हत्यार काढून त्याच्या पोटात भोसकले. त्यामुळे त्याच्या पोटातून मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागल्याने मित्रांनी त्यास दुचाकीवर बसवून जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी याप्रकरणी सातपूर पोलिसात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा नोंद केला होता. परंतु पहाटेच्या सुमाराम अमोल बागले याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.

घटनेची माहिती समजताच अमोलचे नातलगांची जिल्हा रुग्णालयाच्या आवारात गर्दी झाली. त्यामुळे वातावरण अधिकच तणावाचे होऊ लागल्याने तात्काळ सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस व राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात आली. पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्त आर. आर. पाटील, शांताराम पाटील, सरकारवाड्याचे वरिष्ट पोलीस निरीक्षक अशोक भगत, सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी जिल्हा रुग्णालयात येऊन घटनेची माहिती घेतली. तर मृत अमोल बागले याचे वडील अशोक बागले यांनी, संशयितांना कठोर शिक्षा करण्याची मागणी पोलिसांकडे केली. 
 
आठवड्यातील दुसरी घटना 
गेल्याच आठवड्यात 17 वर्षीय तरुणाची निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यामुळे सातपूरचा शिवाजीनगर परिसर गुन्हेगारांना अड्डा बनू पाहतो आहे. याच परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये लुटमारीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. तर, या परिसराचे लोकप्रतिनिधी गुन्हेगारांना आश्रय देत असल्याचा आणि पोलीस मात्र यावर चुप्पी साधून असल्याचा आरोप मृत बागलेच्या नातलगांनी केला आहे.

Web Title: Friends Muurder due to It's too late for the petrol to be taken

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com