काँग्रेससाठी पुण्यात प्रवीणदादाच हवेत!

काँग्रेससाठी पुण्यात प्रवीणदादाच हवेत!

पुणे लोकसभेसाठी काँग्रेसतर्फे प्रवीण गायकवाड यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आणि प्रस्थापितांच्या पोटात गोळा आला. सुरुवातीला संजय काकडेंना आयता आणि बाहेरचा उमेदवार (उघडपणे) म्हणणारी काँग्रेसची मंडळी आता हेच सूर प्रवीण गायकवाड यांच्याबद्दल (छुपेपणाने) आवळताना दिसत आहेत.

प्रवीण गायकवाड म्हणजेच प्रवीणदादा
मराठा सेवा संघाचे सक्रिय कार्यकर्ते आणि संभाजी ब्रिगेडचे संस्थापक असलेले प्रवीणदादा इतिहासाचा अभ्यास आणि उत्कृष्ट वक्तृत्वामुळे गेली अनेक वर्षे ते राज्यभर कुशल संघटकाची भूमिका बजावत आहेत. अनेक वर्षे सामाजिक चळवळीत कार्यरत राहिल्यावर राजकीय पर्याय म्हणून त्यांनी सर्वप्रथम शेतकरी कामगार पक्षाची वाट धरली. फक्त सामाजिक कार्यातून राजकीय परिवर्तन शक्य नाही़; तर त्यासाठी सशक्त राजकीय पर्याय देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सक्रिय राजकारणाची वाट धरावी आणि निवडणुकीतून राजकीय परिवर्तन साधता यावं म्हणून लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

प्रवीण गायकवाड हे सरदार घराण्यातले. पण त्यांची ओळख घराण्यावरून नाही तर त्यांच्या विचारांमुळे झाली. शाहू- फुले- आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा, इतिहासाची जाण आणि वर्तमानाचं भान ठेऊन केलेली मांडणी आणि त्यातलं सातत्य हे त्यांच्या वक्तृत्वाच वैशिष्ट्य. त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या ठाम भूमिकांमुळे बहुजन समाजात, विशेषतः तरुणांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढली. गावकुसावरून शिक्षण रोजगारासाठी पुण्यासारख्या शहरात येणाऱ्या तरुणांना दादा आपले वाटतात. यातच सगळं आलं.

जातींचं श्रेष्ठत्व जपण्यासाठी अनेकदा इतिहासाची मोडतोड केली गेली. मराठा समाजाची काही प्रतीकं मलिन केली गेली. या वादात अनेक नवीन इतिहास संशोधेन होऊन नवीन मांडणी समोर आली. याप्रकारे सुरु असलेल्या इतिहासाचं पुनर्लेखन करण्यास प्रवीणदादांनी प्रोत्साहन दिले. नव्याने होणारी इतिहासाची मांडणी बहुजनांपर्यंत पोहचविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या मांडणीला विरोध करणाऱ्या उजव्या विचारसरणीला त्यांनी कडाडून  विरोध केला. समाजात वर्षानुवर्षे बोकाळलेल्या ब्राह्मण्यवादाला मोडून काढण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे ते कार्यरत आहेत. महाराष्ट्रात झालेल्या पुरोगामी प्रबोधनात त्यांचं योगदान उल्लेखनीय आहे.

बेधडक व्यक्तिमत्त्व
राज्यभरात दोन वर्षांपूर्वी सुरु झालेल्या मराठा क्रांती मूक मोर्चात त्यांची महत्वाची भूमिका होती. मराठा आरक्षणाची बाजू मांडताना त्यांनी मराठा समाजाच्या आर्थिक मागासपणावर अचूक बोट ठेवले. कोरेगाव भीमा मध्ये झालेल्या हिंसाचारात उजव्या विचारसरणीचा हात आहे हे दाखवुन देत गायकवाड यांनी अशा समाजविघातकी कृत्याचा निषेध केला.

पुरोगामी भूमिका ठामपणे मांडतांना त्यांच्या बेधडक स्वभावाची अनेक उदाहरण समाजाने अनुभवली. कोल्हापूरच्या छत्रपती संभाजीराजांनी भाजपतर्फे खासदारकी स्वीकरल्यानंतर त्यांचा जाहीरपणे विरोध करायला ते कचरले नाहीत. शेकाप किंवा इतर संघटनासोबत असतांनाही शरद पवारांबद्दलच प्रेम त्यांनी जाहीरपणे व्यक्त केलं. परिणामाची तमा केली नाही आणि वैचारिक बांधिलकीही सोडली नाही.

पुण्यात काँग्रेसच्या अस्तित्वाची लढाई
पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हटली जाते. अनेक चळवळींचा उदय पुण्यात झाला. या शहराने नेहमीच वैचारिक चळवळी स्वीकारल्या आणि जोपासल्या. म्हणूनच अनेक वर्षे इथे पुरोगामी काँग्रेसचा गड शाबूत होता.

गेल्या काही वर्षात मात्र हे चित्र बदलायला सुरुवात झाली. काँग्रेसजनांच्या नाकर्तेपणामुळे गुंठामंत्र्यांची राष्ट्रवादी शहरात वाढली. काँग्रेसच्या दरबारी नेतृत्वाला काळानुसार बदलता आलं नाही. जुन्या पिढीचे ठराविक लोक कथित क्लबात बसून संपूर्ण शहराचे राजकारण फिरवताना दिसतात. त्यांचा हेतू पक्षवाढीपेक्षा स्वतःभोवती सत्ताकेंद्र निर्माण करण्यापलीकडे कधी गेला नाही.

काँग्रेस हा विचारांचा पक्ष. देश आणि राज्य पातळीवर काँग्रेसचे युवा संघटन मजबूत होत असताना पुण्यात मात्र आजही दरबारी कारभारी आपलं घोड पुढे दामटताना दिसतात. अंतर्गत कलह आणि नव्या नेतृत्वाला डावलून पुढे जाणाऱ्या या पक्षाला पुण्यात बकालपणा आला आहे. राज्य नेतृत्वाने केलेल्या दुर्लक्षाने यात भरच पडली.

आजघडीला निवडणुकीत भाजप विरोधात सक्षम पर्याय, संघटनेची पुनर्बांधणी आणि सत्तेचा गड पुन्हा काबीज करायचा असेल तर अस्तित्वाची लढाई लढणाऱ्या पुणे शहर काँग्रेसला बुरसटलेल्या दरबारी नेतृत्वाच्या विळख्यातून बाहेर पडून पुरोगामी विचारांशी बांधिलकी जपणाऱ्या बहुजन चळवळीतली प्रवीण गायकवाड यांचा हात हातात घ्यावा लागेल.

भाजपकडे झुकलेला शहरी मध्यमवर्ग, काँग्रेसची संपत आलेली विश्वासार्हता, पुणे शहरात उमेदवारी जाहीर करण्यात झालेला उशीर, हातातून निघून गेलेला वेळ, भाजपचे आधीच बळकट असलेले स्थान बघता राष्ट्रवादीचे समर्थन असलेल्या प्रवीणदादांना पाठिंबा देणं हे शहाणपणाचं ठरेल.

Web Title: Shital Pawar writes about Pune Loksabha constituency and Congress candidate Pravin Gaikwad

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com