'आप'ला पाहिजे महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार

'आप'ला पाहिजे महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार

महाराष्ट्रात आम आदमी पक्ष जन नायकांच्या शोधात आहे. मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक असणाऱ्यांनी संपर्क करण्याचे आवाहन आज (ता.03) पुण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आम आदमी पक्षातर्फे करण्यात आले आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा लढत आम आदमी पक्षाचा जन्म झाला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या तीन वर्षाच्या आम आदमी पक्षाने 2015 मध्ये दिल्लीमध्ये 70 पैकी 67 जागा जिंकल्या होत्या. केंद्र सरकार व दिल्लीतील नायब राज्यपाल यांच्या अडवणुकीच्या संकुचित राजकारणावर मात करत दिल्ली सरकारने शिक्षण व आरोग्य क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. 

या प्रकारे देशाला एक नाहीतर अनेक केजरीवालांची गरज आहे, अशाच केजरीवालांची गरज आज महाराष्ट्रालादेखील आहे. जे परिवर्तन दिल्लीत होऊ शकते ते महाराष्ट्रात सुद्धा होऊ शकते. फक्त प्रामाणिक राजकीय नेतृत्वांची गरज आहे आणि म्हणून आम आदमी पक्ष, महाराष्ट्रात सर्वांना मुख्यमंत्री होण्याची संधी देणार आहे. आपची महाराष्ट्रात दमदार संघटन बांधणी चालू असल्याचेही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. 

महाराष्ट्रात आम आदमी पक्षाने संघटन बांधणी आणि पक्ष विस्तारासाठी कंबर कसली आहे. यावर्षी, जानेवारी महिन्यात सिंदखेड राजा येथे झालेल्या सभेत आपचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री श्री अरविंद केजरीवाल यांनी महाराष्ट्रात पक्षाच्या बांधणीला सुरवात केली आहे. त्यावेळी पक्षप्रवेश केलेल्या ब्रिगेडियर सुधीर सावंत (मा. खासदार) यांच्याकडे महाराष्ट्रात पक्ष संघटना वाढवण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

सर्वसामान्य माणूस जेव्हा राजकीय व्यवस्थेच्या केंद्रस्थानी येतो तेव्हा परिवर्तनाची सुरुवात होत असते. आम आदमी पक्ष हा सर्वसामान्य जनतेचा पक्ष आहे. गरीब, श्रीमंत, तरुण, वयस्कर, स्त्री, पुरुष, अनुभवी, अननुभवी, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, लेखक, कलाकार, बेरोजगार, उद्योजक, कष्टकरी, व्यापारी, शेतकरी या सर्वांसाठी संधी असणारा हा पक्ष आहे. सर्व प्रामाणिक व्यक्तींना जबाबदार आमदार, खासदार बनण्याची या पक्षात संधी आहे, अगदी मुख्यमंत्री बनण्याचीसुद्धा संधी आहे. सर्व जिगरबाज लोकांना आम आदमी पक्ष संधी देणार आहे. 

यावेळी, लोकांना आवाहन करताना सांगण्यात आले आहे की, तुम्ही फक्त एक करा, मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न जागेपणी बघा आणि त्यासाठी तहान-भूक हरपून झोप विसरून परिवर्तनाची तयारी करा. तुमच्या मागे पक्ष पूर्ण ताकदीने उभा राहील. यासाठी तुम्ही भेटायला या. तुमच्या काही योजना बनवा. त्याला आम्ही नक्कीच ताकद देणार आहोत. भेटण्यासाठी इच्छुकांनी संपर्क करण्यासाठी www.aapmaha.com या वेबसाईटवर जाऊन आपली सविस्तर माहिती नोंदवण्याचे सांगण्यात आले आहे. पुण्यातील इच्छुकांच्या 11 व 12 ऑगस्ट 2018 रोजी थेट मुलाखती घेण्यात येतील.
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com