अब्दुल सत्तारांचे मुख्यमंत्र्यांवरील प्रेम पुन्हा दिसले....

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 19 मे 2019

औरंगाबाद : दुष्काळात चारा छावणी उभारण्याची मोहिम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येत आहे. सिल्लोड-सोयगांवचे आमदार अब्दुल सत्तार यांना आपल्या मतदारसंघात १४ चारा छावण्या उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे दिला होता. त्यापैकी आठ छावण्यांना मान्यता देण्यात आली आहे. काही चारा छावण्यांचे उद्घाटन सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. चारा छावण्यांच्या निमित्ताने या ठिकाणी लावलेले बॅनर आणि त्यावरील मुख्यमंत्र्यांच्या छायाचित्राने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

औरंगाबाद : दुष्काळात चारा छावणी उभारण्याची मोहिम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात येत आहे. सिल्लोड-सोयगांवचे आमदार अब्दुल सत्तार यांना आपल्या मतदारसंघात १४ चारा छावण्या उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे दिला होता. त्यापैकी आठ छावण्यांना मान्यता देण्यात आली आहे. काही चारा छावण्यांचे उद्घाटन सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. चारा छावण्यांच्या निमित्ताने या ठिकाणी लावलेले बॅनर आणि त्यावरील मुख्यमंत्र्यांच्या छायाचित्राने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. कॉंग्रेसने पक्षातून काढल्यानंतर अब्दुल सत्तार काय भूमिका घेतात याची चर्चा सुरू असतांनाच चारा छावण्यावर मुख्यमंत्र्याचा फोटो झळकल्याने सत्तार यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे. 

लोकसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेऊन बंडाचे निशाण फडकावले होते. कॉंग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला विरोध, अपक्ष अर्ज दाखल आणि मग माघार या घटनाक्रमामुळे सत्तार यांनी आपली उपद्रव शक्ती दाखवण्याचा प्रयत्न केला होता. आतापर्यंत सत्तार यांच्या दबावतंत्राला कॉंग्रेस बळी पडत आली. यावेळी मात्र सत्तार यांचे फासे उलटे पडले.  पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर खालच्या स्तरावर जाऊन केलेली टिका सत्तार यांना चांगलीच महागात पडली. परिणामी कॉंग्रेसने सत्तार यांना 'हात' दाखवत पक्षातून हकालपट्टी केली. दरम्यान, सत्तार यांचे डावेपच सुरूच होते. 

मुंबईत रात्री पावणे दोन वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घेतलेली भेट, रुग्णालयात उपचार घेत असलेले भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन केलेली चर्चा, त्यानंतर एकत्रित विमान प्रवास अशा सगळ्या घडामोडीतून सत्तार यांनी भाजपशी जवळीक साधली होती. पण लोकसभा निवडणुकीचा निकाल लागू द्या, मग पक्ष प्रवेशाचे बघू असे सांगत सत्तार यांना मुख्यमंत्र्यांनी 'वेट ऍन्ड वॉच'चा सल्ला दिल्याची चर्चा आहे. 

मुख्यमंत्र्यांवरील प्रेम पुन्हा दिसले....
लोकसभा निवडणुकीत सत्तार यांनी औरंगाबाद मतदारसंघात रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा जाहीर केला होता. तर जालन्यात त्यांनी वेगळीच भूमिका घेतली होती. सिल्लोड-सोयगांव मतदारसंघातील मतदारांना नकारात्मक मत देण्याचे आवाहन सत्तार यांनी केल्याची जोरदार चर्चा आहे. काही गावांमध्ये सत्तारांच्या या भूमिकेला कडाडून विरोध झाल्याचे देखील पहायला मिळाले.  नकारात्मक मतदानाच्या माध्यमातून सत्तार आपले जुने राजकीय मित्र रावसाहेब दानवे यांना अप्रत्यक्षरित्या मदत करू इच्छितात असे देखील बोलले गेले. तर दुसरीकडे कॉंग्रेसने पक्षातून काढल्यानंतर आगामी विधानसभा आपण अपक्ष निवडून येऊ शकतो का? याची चाचपणी म्हणून सत्तारांनी नकारात्मक मतदानाचा प्रयोग राबवून बघितल्याचा आरोप देखील केला जातोय. 

दुष्काळातील चारा छावण्यात देखील सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांबद्दलचे प्रेम बॅनरवर फोटो टाकून व्यक्त केल्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला हवा मिळाली आहे. २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होत आहे. जालना लोकसभा मतदारसंघात सत्तार यांनी घेतलेली नकारात्मक मतदान करण्याची भूमिका कितपत यशस्वी ठरली यावरच सत्तार यांचे अपक्ष की भाजप प्रवेश? हे निश्‍चित होणार आहे.

 

web tittle: Abdul Sattar's love for the Chief Minister appeared again .


संबंधित बातम्या

Saam TV Live