वॉशिंग मशीन, फ्रीज, एसी, चप्पला महागणार

वॉशिंग मशीन, फ्रीज, एसी, चप्पला महागणार

एअर कंडिशनर, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, जेट इंधन यासह १९ वस्तूंवरील आयात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरूही झालीय...आयात शुल्कवाढीमुळे या सगळ्याच वस्तू महागल्या आहेत.

चैनीच्या वस्तूंची आयात कमी व्हावी या उद्देशाने केंद्र सरकारनं शुल्कवाढीचं पाऊल उचललंय. २०१७-१८ या आर्थिक वर्षात सुमारे ८६ हजार कोटी रुपये किंमतीच्या संबंधित वस्तू विदेशातून भारतात आयात झाल्याची माहितीही यानिमित्ताने समोर ठेवण्यात आलीय. ज्या वस्तूंवर आयात शुल्क वाढवण्यात आलंय त्यात प्रामुख्यानं वॉशिंग मशीन, स्पीकर, रेडियल कार टायर, ज्वेलरी, डायमंड, पादत्राणे, वॉश बेसिन, टेबलवेअर, किचनवेअर, ट्रंक, सुटकेस, ब्रीफकेसेस, ट्रॅव्हल बॅग, अन्य बॅगा, ऑफिस स्टेशनरी, डेकोरेटिव्ह शिट्स इत्यादी वस्तूंचा समावेश आहे.

एसी, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीनवरील आयात शुल्क १० टक्के होतं. त्यात दुप्पट वाढ करून ते २० टक्के करण्यात आलंय. अन्य वस्तूंवरही सरासरी अडीच ते पाच टक्के शुल्कवाढ करण्यात आलीय. भारतात चीनमधून मोठ्या प्रमाणात चैनीच्या वस्तू आयात होतात. केंद्राच्या निर्णयामुळे चीनमधील उत्पादन उद्योगाला मोठा दणका बसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मेक इन इंडियाला चालना देण्याचाही उद्देश या निर्णयामागे असल्याचं केंद्राचं म्हणणं आहे.
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com