२०० वर्ष खड्डे पडणार नाहीत, गडकरींचं आश्वासन

२०० वर्ष खड्डे पडणार नाहीत, गडकरींचं आश्वासन

अहमदपूर : ऊस, साखर व तांदुळाचे उत्पादन देशात अधिक होत आहे. यामुळे ऊसापासून इथेनॉल निर्मिती केल्यास ऊसाला चांगला भाव मिळणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतल्यास त्यास केंद्र सरकार मदत करेल, अशी भूमिका केंद्रीय रस्ते वाहतुकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी (ता. 22) येथे मांडली. तसेच रस्त्यांना 200 वर्षे खड्डे पडणार नाहीत असे वचनही त्यांनी यावेळी दिले.

येथे शुक्रवारी (ता. 22) आयोजित जिल्हा पॅकेजअंतर्गत विविध कामांचे लोकार्पण तसेच कामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार डॉ. सुनिल गायकवाड, आमदार तुषार राठोड, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार सुधाकर भालेराव, आमदार विनायक पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातूरे यांची प्रमुख उपस्थिती होती.  शेतकऱ्यांनी तेलबियांचे उत्पादन वाढवले पाहिजे व इथेनॉल मिश्रीत इंधनाचा वापर सर्वांनी करावा, असे सांगताना मराठवाड्यात सध्या पंधऱा हजार कोटीची चाळीस राष्ट्रीय महामार्गाची कामे सुरू असून नव्या सात हजार पाचशे कोटीच्या कामांना मंजुरी दिल्याची घोषणा केली.

यात सर्वांत  आष्टामोड ते उदगीर व लातूर ते टेंभूर्णी रस्त्याची कामे लवकरात मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पालकमंत्री निलंगेकर यांनी मागणी केलेल्या लातूररोड नांदेड व गुलबर्गा रेल्वेमार्गाच्या मागणीवर येत्या रविवारच्या रेल्वेमंत्र्यांसोबतच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. या वेळी डॉ. शिवलिंग शिवाचार्य यांचा 103 व्या जन्मदिनानिमित्त सत्कार करण्यात आला.  महाराजांच्या आशीर्वादामुळे आम्ही पुन्हा लोकांच्या सेवेत येऊ, असे सांगताना श्री. गडकरी यांनी मागील पन्नास वर्षापेक्षा साडेचार वर्षात आम्ही दुप्पट  केल्याचा दावा केला.

लातूरचे विशेष कौतुक
दुष्काळावर मात कशी करावी, हे लातूरकडून शिकावे. तीन वर्षापूर्वी भीषण टंचाईला सामोरे गेल्यानंतर जलसंधारणाच्या कामांतून लातूर जिल्ह्याने वेगळे अस्तित्व दाखवत राष्ट्रीय जलपारितोषिक पटकावले. यातून शिक्षणासोबत नवा लातूर पॅटर्न निर्माण झाला आहे, अशा शब्दात श्री. गडकरी व श्री. फडणवीस यांनी लातूरचे विशेष कौतुक केले. जलसंधारणात लातूर व राज्याने देशात आघाडी घेतल्याचे सांगून गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले. मुख्यमंत्री यांनी लातूरने शिक्षणासोबत जलसंधारणाचा लातूर पॅटर्न तयार केल्याचे सांगून कामाचा गौरव केला. 

Web Title: Nitin Gadkari speaks about road quality in Latur

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com