सुखना तलावातील पाणी बनले विषारी

सुखना तलावातील पाणी बनले विषारी

औरंगाबाद - कोरड्या तलावात केलेल्या गाळपेऱ्यांवरील भरमसाट कीटकनाशकांच्या वापरामुळे सुखना तलावातील उरलेसुरले पाणी विषारी बनले आहे. या पाण्यात देशीविदेशी पक्ष्यांचा मृत्यू होऊ लागल्याची भयंकर घटना समोर आली असून, पक्षीमित्रांनी तक्रार केल्यानंतर खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. 29) धरणावर धाव घेत सिंचन विभागाच्या निष्क्रीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. 

सुखना नदीवर बांधलेल्या धरणाच्या जलाशयात नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत अनेक देशीविदेशी स्थलांतरित पक्षी येतात. या परिसरातील जैवविविधता आणि मुबलक खाद्य यामुळे वर्षानुवर्षे हे पक्षी येथे येत असतात. मात्र, सिंचन विभागाच्या भ्रष्ट निष्क्रियतेमुळे परिसरातील शेतकऱ्यांनी थेट पाण्यापर्यंत गाळपेरा केला आहे. टरबूज, खरबुजाच्या वाड्या लावल्या आहेत. काही बहाद्दरांनी तर ऊस लावला आहे. या पिकासाठी टाकलेले रासायनिक खतांचे विष थेट तलावाच्या पाण्यात मिसळत असल्यामुळे पक्ष्यांचे मृत्यूसत्र सुरू झाले आहे. 

तलावाच्या पात्राभोवती शंभरावर पाणटिवळे, कवड्या टिवळे, काही धनवर बदक मेलेले शुक्रवारपासून आढळून येत आहेत. तलावात अजूनही शंभर ते दीडशे फ्लेमिंगो वास्तव्यास असून, त्यांच्याही जिवाला धोका निर्माण झाल्याचे पक्षीमित्र डॉ. किशोर पाठक यांनी सांगितले. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी गाळपेऱ्यात रासायनिक खते वापरण्यावर बंधने घालावीत, शेतकरी थेट पाण्यापर्यंत नांगरणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असे निर्देश सिंचन विभागाच्या अभियंत्यांना दिले.  

Web Title: The water in the pond of Sukhna Lake becomes poisonous

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com