दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्राने गाठली पावसाची सरासरी

दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्राने गाठली पावसाची सरासरी

पुणे -  दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्राने पावसाची सरासरी गाठली. मॉन्सून सक्रिय झाल्याने कोकणासह मध्य महाराष्ट्र, घाटमाथ्यावर धुवाधार पाऊस पडत आहे. पुढील दोन दिवसांमध्ये कोकणात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे तेथील प्रशासनाला सतर्क राहण्यासाठी हवामान खात्याने ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे. मराठवाडा आणि विदर्भ मात्र अद्यापही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

राज्यात एक जून ते आठ जुलै यादरम्यान सरासरी २९२.२ मिलिमीटर पाऊस पडतो. सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत २८२.९ मिलिमीटर (वजा ३ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. सरासरीच्या तुलनेत वजा १९ ते १९ टक्के यादरम्यान पडलेला पाऊस सरासरी असतो. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाने सरासरी गाठल्याची माहिती हवामान खात्यातर्फे प्रसिद्ध करण्यात आली आहे. देशात आतापर्यंत सरासरीच्या वजा १९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. देशात पावसाळ्यातील पहिल्या ३८ दिवसांमध्ये सरासरी २३४.५ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा मात्र यादरम्यान १८९.१ मिलिमीटर पाऊस नोंदण्यात आला आहे.

देशातील वीस राज्ये तहानलेली
देशातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेश मिळून ३६ पैकी २० राज्ये अद्यापही तहानलेली आहेत. तेथे पावसाने सरासरी गाठलेली नाही. केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगण, पुद्दुचेरी या दक्षिणेतील केंद्रशासित प्रदेशासह उत्तर आणि ईशान्य भारतात पावसाने सरासरी गाठलेली नाही. राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये आणि अंदमान-निकोबार येथे पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

मॉन्सून लवकरच देश व्यापणार
नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) राजस्थान, पंजाब, हरियाना राज्यांचा काही भाग वगळता देश व्यापला आहे. मात्र, दोन दिवसांपासून मॉन्सूनची वाटचाल ‘जैसे थे’ आहे. देशाच्या आणखी काही भागांत मॉन्सून दाखल होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

असा पडला पाऊस
हवामान उपविभाग ... सरासरी पाऊस (मिमीमध्ये)... पडलेला पाऊस (मिमीमध्ये) ... टक्केवारी
कोकण ............... ९८२.३ ...................... १०९१.७ ....................... ११
 मध्य महाराष्ट्र ........ २१८.९ ...................... २३९.४ .......................... ९
 मराठवाडा ............ १८१.१ ...................... ११९.२ .......................... -३४
 विदर्भ  ................ २४३.७ ...................... १९०.२ .......................... -२२

पावसाचा अंदाज
९ जुलै - कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार; तर मध्य महाराष्ट्रात तुरळक भागात मुसळधार पाऊस पडेल. मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाची शक्‍यता.
१० जुलै - कोकण, गोव्यात जोरदार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्‍यता.

Web Title: The average rainfall in the state reached

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com