कर्नाटकमध्ये आपलं वर्चस्व गाजवण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न

कर्नाटकमध्ये आपलं वर्चस्व गाजवण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न

बंगळूर : कर्नाटकातील कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) आघाडी सरकारवर ओढवलेले अस्थिरतेचे संकट दूर करण्यासाठी आघाडीच्या नेत्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. कॉंग्रेसच्या नेत्यांनी बुधवारी मॅरेथॉन बैठका घेऊन भाजपच्या "ऑपरेशन कमळ'ला रोखण्यासाठी प्रतितंत्र आखण्यासंदर्भात प्रदीर्घ चर्चा केली. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनीही कॉंग्रेस नेत्यांच्या बैठकीत भाग घेतला. दुसरीकडे बंडखोर कॉंग्रेस नेते रमेश जारकीहोळी यांनीही असंतुष्ट आमदारांची बैठक घेऊन सरकारवरील दबाव आणखी वाढवला. 

नरेंद्र मोदी यांचा आज पंतप्रधानपदी शपथविधी झाल्यानंतर राज्यातील आघाडी सरकार अस्थिर करण्याच्या हालचाली वाढण्याची शक्‍यता आहे. त्यातच असंतुष्ट आमदारांनीही हालचाली सुरू केल्याने आघाडीच्या नेत्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली आहे. आज दिवसभर झालेल्या बैठकांतून यावर मार्ग काढण्याबाबत चर्चा करण्यात आली. 

असंतुष्ट आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी सध्या रिक्त असलेली मंत्रिपदे त्यांना देण्याचे ठरले. मंत्रिमंडळ विस्तारानंतरही नाराजी कायम राहिल्यास मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्यावरही चर्चा झाली. जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात कॉंग्रेस व जेडीएसच्या आठ मंत्र्यांचे राजीनामे घेऊन आठ असंतुष्ट आमदारांची वर्णी लावण्यावरही विचारमंथन झाले. 

एकीकडे सरकार वाचविण्यासाठी युतीच्या नेत्यांची बैठक सुरू असतानाच रमेश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली असंतुष्ट आमदारांचीही बैठक झाल्याने औत्सुक्‍य निर्माण झाले आहे. मंत्रिपद देण्याचा आघाडीच्या नेत्यांचा प्रस्ताव फेटाळलेल्या जारकीहोळी यांनी पुढील वाटचालीवर आपल्या निकटवर्ती आमदारांशी चर्चा केली. 

खादर राजीनामा देण्यास तयार 

कॉंग्रेस नेत्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा मागितल्यास कोणत्याही क्षणी देण्याची तयारी असल्याचे स्पष्टीकरण मंत्री यू. टी. खादर यांनी दिले. "कुमारकृपा' अतिथीगृहात नेत्यांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सरकार वाचविण्यासाठी मी आनंदाने राजीनामा देईन. प्रथम पक्ष वाचला पाहिजे. त्यानंतर आमदार व मंत्रिपद आहे. पक्षाच्या हितापेक्षा कोणीही मोठा नाही, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Congress Trying to Stable Their Government in Karnataka

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com