ईशान्य मुंबईत तिरंगी लढत

ईशान्य मुंबईत तिरंगी लढत

भांडुप - ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत होणार असली तरी भाजपचा उमेदवार अद्याप गुलदस्त्यात आहे. पालघर आणि ईशान्य मुंबई मतदारसंघांची अदलाबदल होईल, अशीही चर्चा आज होती. भाजपच्या अमराठी उमेदवारासमोर मनसेची मराठी मते राष्ट्रवादीचे संजय पाटील खेचून घेणार का, असा महत्त्वाचा प्रश्‍न इथे आहे.  

ईशान्य मुंबई मतदारसंघात शिवसेना-भाजप युती, राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी आणि प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी असे तीन उमेदवार उभे राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार म्हणून माजी खासदार संजय दिना पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली असून त्यांची निवडणुकीचा प्रचारही सुरू केला आहे. खरे पाहता त्यांनी सहा ते आठ महिने आधीपासूनच उमेदवारीचे संकेत मिळाल्यावर तयारी सुरू केली होती.

भाजपचा मित्रपक्ष शिवसेना आणि आरपीआय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भाजपचे विद्यमान खासदार किरीट सोमया यांच्या उमेदवारीस प्रचंड विरोध दिसून येत आहे. सोमय्या यांनी सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि कार्यकर्त्यांवर केलेली टीका त्यासाठी कारणीभूत असल्याचे बोलले 
जात आहे.

वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेला उमेदवार बदलला. त्यामुळे त्यांच्या नव्या उमेदवाराबाबत उत्सुकता आहे. तो संजय पाटील यांच्याच मुळावर येणार असल्याने पुढे काय होते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. सप-बसप उमेदवारही पाटील यांची मते खेचणार हे निश्‍चित आहे. उलट कट्टर मराठीवादी मनसे मतदारांचे पारडे किरीट सोमय्या यांच्याकडे झुकते की त्यांची मते पाटील यांना मिळतात हे पाहणे मनोरंजक ठरेल. मनसेची मते खेचण्यासाठी पाटील कसोशीने प्रयत्न करणार, हे निश्‍चित. 

तोलामोलाचे उमेदवार मानले जाणारे संजय पाटील वंचित आघाडी, सप व मनसे यांच्याबाबत वेगवेगळी धोरणे राबवून भाजपला तोडीस तोड लढत देतील, यात शंका नाही.

म्हणूनच उमेदवार जाहीर नाही!
ईशान्य मुंबईत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवलेदेखील इच्छुक होते. त्यांना उमेदवारी न दिल्याने भीमसैनिक नाराज आहेत. आम्ही एनडीएत असलो तरी किरीट सोमय्या यांना मतदान करणार नाही, असा पवित्रा शिवसैनिक आणि भीमसैनिकांनी घेतला आहे. त्याचमुळे भाजपकडून सोमय्या यांची अधिकृतरीत्या उमेदवारी अजूनही घोषित करण्यात आलेली नाही, अशी चर्चा आहे.

Web Title: Loksabha Election 2019 Northeast Constituency Politics

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com