पुणे-साताऱ्यामध्ये पाणी संघर्ष पेटणार?

पुणे-साताऱ्यामध्ये पाणी संघर्ष पेटणार?

भवानीनगर - माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी बारामतीच्या नीरा डाव्या कालव्याला अतिरिक्त पाणी जात असून, ते मुख्यमंत्र्यांना थांबविण्यास सांगितले आहे, असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओचे बारामती व इंदापूर तालुक्‍यांत प्रतिसाद उमटू लागले आहेत. डाव्या कालव्यावर आताच हाणामारी होत असताना सरकारने तीन टीएमसी पाणी उजव्या कालव्याला वळवले, तर काय करायचे, असा प्रश्‍न विचारला जात आहे.

भाजप खासदाराच्या वक्तव्यानंतर आता पुणे व सातारा जिल्ह्यांत पाण्याचा संघर्ष उद्‌भवण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. नीरा डाव्या कालव्यावरील वितरिकांना आताच पूर्ण पाणी मिळत नाही, अशा स्थितीत या कालव्याच्या वाट्याला आलेले अधिकचे पाणी बंद करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना सांगणार असून, तसा ठराव करून घेणार असल्याचे खासदारांनी म्हटले आहे, त्यामुळे इंदापूर व बारामतीतील शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. 

वस्तुस्थिती काय?
यासंदर्भात जलसंपदा विभागाच्या नीरा डावा कालव्याचे कार्यकारी अभियंता म्हणून काम पाहिलेल्या निवृत्त अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी माहिती दिली ती अशी, अगदी सुरवातीला भाटघर धरण होते, त्यात पाच टीएमसी पाणी होते. त्यानंतर १९३० मध्ये भाटघरची नव्याने बांधणी होऊन तेथील साठा २४ टीएमसी झाला. त्यातील पाण्याचे नीरा डावा कालव्यास ३०, तर उजव्या कालव्यास ७० टक्के असे वाटप ठरले. डाव्या कालव्याअंतर्गत पुरंदरचा काही भाग, बारामती व इंदापूर हे तालुके येतात, तर उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात फलटण, माळशिरस, सांगोला, पंढरपूर हे तालुके येतात. सन १९६२ मध्ये वीर धरण बांधण्यात आल्यानंतर त्यातील ४३ टक्के पाणी नीरा डावा, तर ५७ टक्के पाणी उजवा कालवा असे वाटप ठरले. एकूण वीर धरणातून १० टीएमसी पाणी नीरा डावा, तर २० टीएमसी पाणी फलटणकडे जाते. नंतरच्या काळात नीरा देवघर धरणाची निर्मिती झाल्यानंतर ते धरण छोटे असून त्यातील वाटप ६० टक्के नीरा डावा कालवा, तर ४० टक्के हे उजवा कालव्याकडे वितरित करण्याचा निर्णय झाला.

कालानुरूप डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात होत गेलेली वाढ व अपुरे पडू लागलेले पाणी हेच कारण होते. हे प्रकरण नव्याने उकरून काढले गेल्याने आता भविष्यात पुणे व सातारा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा पाण्यासाठी संघर्ष होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. पाण्यासाठी हातघाई करणाऱ्या इंदापूर, बारामती तालुक्‍याच्या तोंडचे तीन टीएमसी पाणी पळवले गेल्यास संपूर्ण उन्हाळा यापुढे कोरडा जाण्याची भीती आहे, त्यामुळे फलटणची टंचाईची बैठक या दोन तालुक्‍यांतील शेतकऱ्यांना अस्वस्थ करणारी ठरली आहे.

Web Title: Pune Satara Disturbance on Water Shortage

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com