'मातोश्री'च्या गनिमी काव्याने भाजप घायाळ ! 

'मातोश्री'च्या गनिमी काव्याने भाजप घायाळ ! 

मुंबई - शिवसेनेच्या आक्रमक "गनिमी काव्या'ने भाजप घायाळ झाल्याचे चित्र आहे. "मातोश्री'वर टाचणी पडली तरी ती भाजपच्या नेतृत्वाला कळते, असा आत्मविश्‍वास बाळगणाऱ्या भाजपच्या धुरिणांना यावेळी मात्र "मातोश्री'वरील रणनीतीचा अंदाजच येत नसल्याचे आश्‍चर्य वाटत आहे. 

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 2014 पासून सतत राजकीय डावपेचात कोंडी करून घेत असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू होती. मात्र, मनसेचे सहा नगरसेवक फोडण्याची किमया साधताना ना मनसेला कुणकुण लागली ना भाजपच्या गुप्तहेरांना सुगावा लागला. मुख्यमंत्री परदेश दौऱ्यावर असताना मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता. त्यावेळी भाजप नेत्यांची उडालेली त्रेधातिरपीट सर्वश्रूत आहे. त्यानंतर आता पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत दिवंगत भाजप खासदार चिंतामण वनगा यांच्या चिरंजीवाचा शिवसेना प्रवेश व त्यांनाच उमेदवारी देत उद्धव ठाकरे यांनी भाजपला चांगलेच डिवचले आहे. 

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी जिथे संख्याबळ आहे तिथे स्वबळावर उमेदवार देऊन ठाकरे यांनी भाजपला कोंडीत पकडले. त्यातच पलूस विधानसभा पोटनिवडणुकीत थेट कॉंग्रेसला पाठिंबा देत भाजपच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार ठाकरे यांनी केल्याचे मानले जाते. 

केंद्रात मोदी सरकारला 2014 सारखे एकहाती यश मिळवण्यात अडचणींचा अंदाच व्यक्‍त होत असताना मित्रपक्ष शिवसेनेने सुरू केलेल्या कुरघोडीच्या खेळीने आक्रमक भाजपला सबुरीचे धोरण घ्यायला भाग पाडल्याचे चित्र आहे. 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत युती केल्यास पुन्हा विधानसभेला भाजप शिवसेनेला एकाकी पाडू शकते, असा विश्‍वास असल्यानेच उद्धव ठाकरे यांनी आता निर्णायकपणे "स्वबळाचा' निर्धार केल्याचे हे संकेत असल्याचे शिवसेना नेते सांगत आहेत. 

उद्धव ठाकरे यांनी विदर्भातला दौरा सुरू केला असून भंडारा-गोंदियामध्ये भाजप उमेदवाराबाबत सगळे डावपेच गुलदस्त्यात ठेवले आहेत. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे भाजपची अवस्था मात्र धरले तर चावते अन्‌ सोडले तर पळतेय, अशी झाल्याची चर्चा रंगत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com