'फेडरर' म्हणजे 'सातत्य'..

20 Grand Slam Champion ,
20 Grand Slam Champion ,

नुसती १८-२० ग्रँडस्लॅम विजेतेपदे ही फेडररची कमाई नाही. विक्रम तर काय, मोडलेच जाण्यासाठी असतात. रॉजर फेडरर खेळाडू नाही. फेनॉमेनां वगैरे शब्दही गुळगुळीत आणि मर्यादित वकुबाचे झाले. रॉजर फेडरर ही वृत्ती आहे. इंग्रजी, नव्हे इंग्रजीच का, मराठीमध्येही, नवीन शब्द जर निर्माण करायचा झाला तर 'फेडरर' हा शब्द वापरात आणला जाऊ शकतो. कमालीचं आणि अक्षरशः कमालीचं सातत्य, आणि त्या तोडीला चिकाटी, जिद्द स्टॅमिना ह्या सगळ्याचा समुच्चय म्हणून रॉजर फेडररकडे पाहता येतं. म्हणूनच 'सातत्य' ह्या शब्दाला (आणि वृत्तीला) 'फेडरर' हा समर्पक प्रतिशब्द मिळायला हरकत नाही.

जगभरातल्या सार्वकालिक महान टेनिस खेळाडूंमध्ये फेडरर सर्वोच्च स्थान प्राप्त करतो काय? नदालचे समर्थक अमान्य करतील आणि ते त्यांच्या बाजूला अत्यंत योग्य आहेत. रॉजर फेडरर अजेय तर अजिबातच नाही. आजच्या घडीला राफेल नदाल, नोवाक जोकोविच, अँडी मरे, जुआन कार्लाओस डेल पोट्रो हे खेळाडू त्याला खात्रीने घरी पाठवू शकतात. किंबहुना गेली सुमारे सहा वर्षे कोणतीही स्पर्धा सुरु होते तेंव्हा संभाव्य विजेत्यांच्या यादीत कधीही रॉजर फेडरर नसतो. मग राफा, जोको, मरे ही एकेक मंडळी बाहेर पडायला लागली की ह्याच्यावर नजरा पडतात. कालच्याच ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सेमीफायनलला रॉजर फेडररसकट, नदाल, जोकोविच, अँडी मरे किंवा डेल पोट्रो पोहोचले असते तर यांच्यापैकी कोणीतरी एक नक्कीच फेडररला भारी पडला असता.

डेल पोट्रोचा एक किस्सा आठवतो. २००९ च्या फ्रेंच ओपनची सेमीफायनल चालू होती. अर्थातच राफेल नदाल बाहेर पडला असल्याने फेडरर जिंकणार ह्यावर शिक्कामोर्तब होतं. (आजही हेच होतं. ह्यांच्यासाठी काळ थांबून राहिलाय की काय? तेही ९ वर्षं?). फेडरर अत्यंत वाईट खेळत होता. शॉट्स बसत नव्हते. सर्व्हिस नीट होत नव्हती. आणि भरीस भर मातीच्या कोर्टावर हा किमान सात वेळा चांगलाच घसरला. तरीही फेडररने ती लढत जिंकली. का जिंकली ठाऊक आहे? कारण फेडरर वाईट खेळत असेल तर डेल पोट्रो घाणेरडा खेळत होता. फेडरर मातीत खेळात असेल तर हा चिखलात खेळत होता. फेडररच्या दुप्पट हा घसरला. नशीब आणि केवळ नशीब म्हणून तो दिवस डेल पोट्रोचा नव्हता म्हणून फेडरर अंतिम सामन्यात पोहोचला. आणि तेच त्याचं एकमेव फ्रेंच ओपन विजेतेपद. पुढे ह्या डेल पोट्रोने फेडररला यूएस ओपनमध्ये हरवलं. नंतरही हरवलं. आणि आत्ता कालपरवा यूएस ओपनमध्ये पुन्हा उपांत्य फेरीत हरवलं. (आणि या भन्नाट खेळाडूला अंतिम सामन्यात राफेल नदालने किती सहज थांबवलं?) 

आजही निव्वळ तुलना केली तर समोरासमोर आल्यास नदाल हा केंव्हाही फेडररपेक्षा सरस आहे. नदालच्या उदयानंतर आजपर्यंत ज्या ५३ ग्रँडस्लॅम स्पर्धा खेळवल्या गेल्या त्यात ह्या दोघांनी मिळून ३२ जिंकल्या आहेत. त्यातही दोघांनी प्रत्येकी सोळा, आणि नदालनेतर अत्यंत दमवणारी आणि धूळ चारणारी फ्रेंच ओपन तब्बल १० वेळा जिंकली आहे. आकडेच सगळं सांगतात. खरी हुशारी तीच असते. 


मग फेडररचं वेगळेपण कशात आहे? 
२० ग्रँडस्लॅम विजेतेपदे मिळवणारा फेडरर ३० वेळा अंतिम सामन्यात पोहोचला. ४३ उपांत्य सामने खेळलाय आणि २००१ पासून तब्बल ५२ उपांत्यपूर्व सामने खेळलाय. राफेल नदाल, जोकोविच, आणि डेल पोट्रो आत्ताच्या स्पर्धेत होतेच ना! २००५ पासून राफेल नदाल आणि पुढे जोकोविच हेही खेळतच आहेत ना! ह्यांच्या उदयानंतर फेडरर उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम सामन्यात कितीवेळा पोहोचला ह्याची मोजदाद केली तर काय दिसतं? उर्वरित प्रतिस्पर्धी ह्याच्या आसपास पण नाहीयेत. बाकीच्या सर्वांनी अनेकदा अनफिट म्हणून माघार घेतली, अथवा यांना तिसऱ्या किंवा चौथ्या फेरीत गाशा गुंडाळावा लागला. त्याहीवेळी फेडरर उपांत्य किंवा अंतिम फेरीत जातच होता. 

२०१२ च्या विम्बल्डननंतर पुढचं विजेतेपद मिळवायला त्याला साडेचार वर्ष लागली. त्याची सद्दी पूर्णपणे संपली असा निष्कर्ष काढला गेला. मधला काळ जोकोविचने गाजवला. अँडी मरेने काही चमक दाखवली. वृत्तपत्रांचे 'बाय बाय फेडरर' वगैरे लेखही लिहून झाले. त्यात त्यांची काय चूक? कारण खेळाडूसाठी तीस, बत्तीस आणि पस्तीस हे काही तारुण्याचा बहर असलेलं वय नाही. कामगिरी खालावते, दुखापती वाढतात आणि त्यातून बाहेर पडायला शरीर साथ देत नसतं. ह्यालाच काळाचा महिमा म्हणतात. 

पण रॉजर फेडररला दुखापती होत्या कुठे? सद्दी संपण्याच्या काळात, त्याची जादू ओसरण्यानंतर, इतरांनी आपलं राज्य पसरावायच्या काळात तो करत काय होता? त्याही काळात तो सातत्याने उपांत्यपूर्व किंवा उपांत्य किंवा अगदी अंतिम सामन्यातही धडक मारतच होता ना. म्हणजे जोकोविच सर्वोत्तम असतानाही फेडरर उत्तमच होता ना! राफेल नदाल जबरदस्त असतानाही फेडररपण दमदार होताच ना! आज ह्या खेळाडूंना (त्यातही जोकोविचला) दुखापतींनी ग्रासलं, त्यांचा फॉर्म थोडा कमी झाला तेंव्हा त्यांचं 'सर्वोत्तम' थांबलं. दुखापतींमुळे ते दमदारही नाही राहिलं. त्याचवेळी अजूनही दमदार असलेला फेडरर सरस ठरायला लागला. रॉजर फेडररला ह्या दोन खेळाडूंकडूनच सर्वाधिक पराभव मिळाले आहेत. त्याच वेळी ह्या दोन खेळाडूंना कोणाकडूनही आणि कधीही पराभव स्वीकारावे लागले आहेत. म्हणजे एक आणि दोन नंबरच्या क्षमतेचे खेळाडू अनेकदा पाच सहा सात नंबरच्या क्षमतेपर्यंत उतरले, त्याचवेळी तिसऱ्या नंबरच्या क्षमेतचा हा खेळाडू तिथेच राहिला. त्यांच्या कामगिरीत चढउतार होत राहिले, हा मात्र तसाच राहिला. 'सातत्य' म्हणतात ते यालाच. 

मैदानावर फेडरर पंख लावल्यासारखा फिरत असतो. फ्रेंच ओपनमध्येही त्याचे बूट फार मळत नाहीत. त्याचा दणदणीत तिखट फोरहँड आणि तितकाच हुकुमी आणि सुसाट बॅकहँड ह्यांचं कौतुक असंख्यवेळा असंख्य लोकांनी केलंय. नदाल एवढं मैदान व्यापायचा प्रयत्न त्याने केला नाही. समोरच्याचा ड्रॉपशॉट नेटजवळ पडला तर गेली काही वर्ष तो धावतही नाही. उलट दिशेने जीव घेऊन धावणं त्याने केल्याचं फार आठवत नाही. (मात्र जेंव्हा केलं तेंव्हा समोरचा नुकसानीत राहायचा). गेली दोन वर्षे तो जीवघेणी फ्रेंच ओपन स्पर्धाही खेळलेला नाही. त्याची पाठ, खांदे, घोटे अजून जागच्याजागी आहेत कारण तो हे सगळं करायच्या मोहात फार पडला नाही. त्याचं पाहिलं मोठं ऑपरेशनच पस्तिशीत झालं ह्यावरून त्याने स्वतःच्या घेतलेल्या काळजीची कल्पना यावी. आणि त्या ऑपरेशनमधून बाहेर येऊन त्याने गेल्या वर्षी थेट ऑस्ट्रेलियन स्पर्धा जिंकली.

फेडररने यापुढे एकही स्पर्धा जिंकली नाही तर राफेल नदालला येणाऱ्या सगळ्या स्पर्धा जिंकून फेडररचा रेकॉर्ड मोडायला किमान मे २०१९ उजाडेल. नोवाक जोकोविचला २१ विजेतेपदे मिळवायला किमान मे २०२० उजाडेल. म्हणजेच फेडरर त्या अजिंक्यपदावरची २००९ पासूनची दहा वर्षे सहज पूर्णकरेल.

वातावरण आणि समाजमाध्यमे सातत्याने नकारात्मक होत असताना, आनंदमय, उदात्त, उन्नत आणि भव्य काही असेल तर हेच आहे. खेळाचं विश्लेषण अनेकजण अप्रतिमच करतात. पण त्यातून आपल्याला कायमस्वरूपी काय मिळू शकतं ह्याचा विचार करायला हरकत नाही.

फेडररपणे (सातत्याने) सर्वोत्तम असच अनुभवायला मिळो.

marathi news blog on roger federer by Sourabh Ganpatye
SOURABH GANPATYE

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com