'श्वास' थांबला अन् 'जोश' ही...

'श्वास' थांबला अन् 'जोश' ही...

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (वय 63) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. चारवेळा मुख्यमंत्रिपद आणि देशाच्या संरक्षणमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या पर्रीकर यांची स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी काही वर्षांपासून झुंज सुरू होती. काल त्यांची प्रकृती आणखी खालावली. अखेर आज सायंकाळी 6.40 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. उद्या सायंकाळी पाच वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाबद्दल एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. 

गेल्या दोन दिवसांपासून पर्रीकर यांची प्रकृती खालावली होती, त्यामुळे त्यांना "व्हेंटिलेटरवर' ठेवण्यात आले होते. आज संध्याकाळी त्यांची प्रकृती आणखी खालावली. गोमेकॉ इस्पितळाच्या डॉक्‍टरांनी त्यांच्यावर उपचारांची शर्थ केली; परंतु त्यात यश आले नाही. पर्रीकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच ताळगाव येथील त्यांच्या खासगी निवासस्थानी सरकारमधील मंत्री, आमदार, भाजप नेते, तसेच मुख्य सचिव व पोलिस महासंचालकांनी धाव घेतली. पर्रीकर यांच्यामागे दोन चिरंजीव आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाल्याचे फेब्रुवारी 2018 मध्ये उघडकीस आले. त्यानंतर त्यांना सुरवातीला दिल्लीतील एम्स रुग्णालयात व नंतर अमेरिकेत उपचारांसाठी नेण्यात आले होते. तेथून उपचार घेऊन ते गोव्यात परतले होते. 2018 मध्ये पावसाळी अधिवेशनात त्यांनी कामकाज हाताळले होते व त्यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा ढासळली, त्यामुळे त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर गेल्या 14 ऑक्‍टोबर 2018 रोजी एम्स रुग्णालयातून त्यांना स्ट्रेचरवरूनच गोव्यात आणले होते. ताळगाव येथील निवासस्थानीच त्यांच्यावर उपचार सुरू होते. वारंवार प्रकृती बिघडल्यास त्यांना गोमेकॉ इस्पितळात दाखल केले जात होते व त्यांच्या चाचण्याही केल्या जात होत्या. गेल्या महिन्यात त्यांची प्रकृती खालावल्याने दिल्लीतील "एम्स'च्या डॉक्‍टरांनी त्यांच्यावर उपचार केले होते. दोन महिन्यांपूर्वी 27 जानेवारी रोजी मांडवी नदीवरील नव्या पुलाच्या, "अटल सेतू'च्या उद्‌घाटनालाही ते नाकाला नळी लावलेल्या स्थितीत उपस्थित होते. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांशी बोलताना त्यांनी उरी चित्रपटातील "हाऊ इज द जोश?' हा प्रश्‍न विचारला. त्याला विद्यार्थ्यांनीही "हाय सर' असे उत्स्फूर्त उत्तर दिले होते. 

संघाचे प्रचारक ते संरक्षणमंत्री अशी मोठी झेप त्यांनी आपल्या कर्तृत्वाने घेतली. राजकीयदृष्ट्या अस्थिर अशा गोवा राज्याचे मुख्यमंत्रिपद त्यांनी समर्थपणे सांभाळले. चारवेळा मुख्यमंत्रिपद सांभाळणाऱ्या पर्रीकरांनी तीन वर्षे देशाचे संरक्षणमंत्रिपदही सांभाळले. त्यांचा जन्म 13 डिसेंबर 1955 रोजी मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. आयआयटी- मुंबईमधून त्यांनी धातुशास्त्र विषयात अभियांत्रिकीची पदवी संपादित केली. त्यांनी 1994 मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश केला. तेव्हा ते भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर पणजी मतदारसंघातून निवडून आले. जून ते नोव्हेंबर 1999 मध्ये ते विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. त्या वेळी कॉंग्रेसविरोधातील त्यांची भाषणे गाजली. ते 24 ऑक्‍टोबर 2000 मध्ये पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. 27 फेब्रुवारी 2002 पर्यंत मुख्यमंत्री होते. पाच जून 2002 रोजी पुन्हा मुख्यमंत्री झाले. भाजपच्या चार आमदारांनी राजीनामा दिल्याने 29 जानेवारी 2005 रोजी त्यांचे सरकार अल्पमतात आले. त्यानंतर 2012 मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने 40 पैकी 21 जागा जिंकून बहुमत सिद्ध केले. त्यांच्या नेतृत्वाखाली 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीतही भाजपने चांगली कामगिरी केली. नोव्हेंबर 2014 मध्ये ते केंद्रात मंत्री झाले. 2017 पर्यंत केंद्रीय मंत्री होते. गोवा विधानसभेत 2017 मध्ये भाजपला बहुमत मिळविता न आल्याने ते पुन्हा गोव्यात आले व सहकारी पक्षांना बरोबर घेऊन राज्यात सत्ता स्थापन केली होती. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com