Loksabha 2019 :: तापमानाने केली चाळीशी पार, उन्हाच्या त्रासामुळे मतदारराजाने प्रचारसभाकडे फिरवली पाठ

Loksabha 2019 :: तापमानाने केली चाळीशी पार, उन्हाच्या त्रासामुळे मतदारराजाने प्रचारसभाकडे फिरवली पाठ

मरवडे (जि. सोलापूर) : सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापत असताना उन्हाचा तडाखाही वाढत आहे. तापमानाने चाळीशी पार केली असल्याने वाढत्या तापमानाचा निवडणूक प्रचारसभावर परिणाम होत आहे. उन्हाच्या त्रासामुळे मतदारराजाने प्रचारसभाकडे पाठ फिरवली असल्याने प्रचारप्रमुखांना चांगलाच ज्वर भरला आहे. सभेतील गर्दीवर उमेदवाराच्या यश-अपयशाची गणिते आखली जात असल्याने देवा,जरा ऊन कमी करा असे साकडे प्रचारप्रमुख व उमेदवाराकडून घातले जात आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी (ता.8) तर माढा मतदारसंघासाठी मंगळवारी (ता.23) रोजी मतदान होत आहे. मतदानाची तारीख जवळ येऊ लागली असल्यामुळे गावोगावी होणाऱ्या प्रचारसभांना वेग आला आहे. प्रचारसभातून मतदारराजाशी संवाद साधायचा व त्याचे मतदानाचे पवित्र दान आपल्या पदरात पाडून घ्यायचे असे मनसुबे उमेदवारांकडून रचले गेले जात असताना वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे प्रचारसभावर पाणी फिरत असून मतदारराजास एकत्रितपणे मताचा जोगवा मागण्याचे मनसुबे धुळीस मिळत आहेत.

गेल्या काही दिवसापासून तापमानाने जिल्ह्यात चाळीशी ओलांडली असल्याने उन्हाच्या प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या वातावरणात निवडणुका होत असताना उन्हाच्या पाऱ्याबरोबर आपल्याच राजकीय पक्षाच्या उमेदवारचे मताधिक्य चढते राहिले पाहिजे यासाठी प्रचारप्रमुखाकडून प्रयत्न होत आहेत. सर्व मतदारराजापर्यंत पोहचण्यासाठी स्टारप्रचारकासमवेत दररोज वीस ते तीस सभांचे नियोजन केले जात आहे. मोठी लोकसंख्या असलेल्या गावात सकाळ - संध्याकाळच्या वेळेत सभा तर इतर ठिकाणी भर दुपारीच सभा घ्याव्या लागत आहेत. दिवसभर असलेल्या सभेसाठी गेल्यानंतर वाढत्या उन्हामुळे कोणीच हजेरी लावत नसल्यामुळे 'फक्त गावभेट' होत आहे.

दिवसभराच्या सभेत मोजकेच हजेरी लावत असल्याने प्रचारप्रमुखांनी शक्कल लढवीत ग्रामपंचायत निवडणूकीच्या वेळी वापरण्यात येणारे 'होम टू होम' हे प्रचारतंत्र वापरण्यास सुरुवात केली आहे. कार्यकर्ते मंडळीचे गट करीत मतदारास घरीच गाठायचे व आपल्या पक्षाचा उमेदवार इतरांपेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे समजावून सांगितले जात आहे. तर काही नेतेमंडळीनी आपल्या सोबत भला मोठा ताफा घेऊन या ताफ्यातील कार्यकर्त्यांसोबत सभा घायची व आमच्या सभेत मतदारांनी मोठी गर्दी केली असे भासवत जनमानसात प्रतिमा तयार करायची व विरोधकांचा रागाचा पारा वाढविण्याचे तंत्रही वापरले जात आहे. उन्हाच्या वाढत्या पाऱ्यामुळे पारावर रंगणाऱ्या सभा दारावर आल्या असल्यामुळे आता दुष्काळात होरपळून निघालेला मतदारराजा कोणाच्या पदरी मताचे दान टाकणार हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

मतदानासाठी जागृती -
भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे. वाढत्या उन्हाचा फटका या मतदानावर होऊ नये यासाठी समाजमाध्यमे सरसावली आहेत. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सकाळ माध्यम समूहाच्या माध्यम समुहाच्या वतीनेही 'आय विल व्होट' हा उपक्रम राबविला जात आहे. समाजाच्या सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक करीत निसर्गराजा कोपला तरी आम्ही मतदान करणारच असा निर्धार मतदारराजाकडून केला जात आहे.

Web Title: Effect on election campaign meetings due to temperature rise

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com