गणपतीपुळेचा ९१ कोटींचा विकास आराखडा मंजूर

गणपतीपुळेचा ९१ कोटींचा विकास आराखडा मंजूर

रत्नागिरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत शिखर समितीने ९१ कोटींच्या गणपतीपुळे विकास आराखड्यास मंजुरी दिली. म्हाडा अध्यक्ष व आमदार उदय सामंत यांनी सहा महिन्यांपूर्वी गणपतीपुळेवासीयांना शब्द दिला होता, तो पूर्ण केला. या निर्णयामुळे गणपती पुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटनस्थळ बनण्याकडे वाटचाल करणार आहे. 

गणपती पुळेच्या जुन्या विकास आराखड्यात अनेक त्रुटी होत्या. त्या दूर करत नवीन आराखड्याची रचना केली. परिपूर्ण ९१ कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सादर केल्यानंतर सहा महिन्यांतच विकास आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. 

दरम्यान, ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्या अंतर्गत श्री संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी आमला (ता. दर्यापूर, जि. अमरावती) साठी ६.७९ कोटी, त्यांचे अंतिम श्रद्धास्थान नागरवाडी (ता. चांदूरबाजार, जि. अमरावती) साठी १८ कोटी आणि हिंगोलीतील संत नामदेव संस्थानसाठी पहिल्या टप्प्यात १५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यासही मान्यता दिली.

काय आहे आराखड्यात...
गणपतीपुळे विकास आराखड्यामध्ये रस्त्यांसाठी ४० कोटी, पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी २३ कोटी, सांडपाणी प्रक्रियेसाठी ११ कोटी, घनकचरा व्यवस्थापनासाठी ४.५० कोटी, पार्किंग व्यवस्थेसाठी १.५० कोटी व सुशोभीकरणासाठी ११ कोटी अशा कामांचा समावेश आहे.

यंदा मिळणार १० कोटी
आराखड्यातील कामांसाठी सुमारे १० कोटींचा निधी यावर्षी मिळणार आहे. बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘गणपतीपुळे तीर्थक्षेत्र महाराष्ट्राचे आयकॉन आहे. भाविकांना तेथे चांगली सुविधा मिळावी; तसेच मंदिर परिसर स्वच्छ असावा, यासाठी सजग राहावे. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठी योग्य ते नियोजन करावे. साफसफाईसाठी मनुष्यबळ खासगी माध्यमातून घ्यावे.’’  

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com