नाशकात अतिवृष्टीच्या शक्‍यतेने अतिदक्षतेचा इशारा

नाशकात अतिवृष्टीच्या शक्‍यतेने अतिदक्षतेचा इशारा

नाशिक : मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे गोदावरीसह दारणा, वालदेवी, वाघाडी, नासर्डी आणि सिन्नर तालुक्‍यातील म्हाळुंगी व सुरगाणा तालुक्‍यातील नार, दमणगंगा नदी खळाळून वाहू लागली आहे. आदिवासी पट्यात 18 तासांपासून जोरदार पाऊस हजेरी लावत असून हवामान विभागाच्या अतिवृष्टीच्या शक्‍यतेने गोदाकाठी अतिदक्षतेचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे. गोदाकाठच्या काझीगढीवरील 35 कुटुंबांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. त्र्यंबकेश्‍वर शहरामध्ये पाणी शिरल्याने पूरपरिस्थिती तयार झाली आहे.

जिल्ह्यात आज सकाळी आठला संपलेल्या चोवीस तासात इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर, पेठ, सुरगाणा तालुक्‍यात अतिवृष्टी पाऊस झाला आहे. गंगापूर धरणातून पाणी न सोडताही गटारीचे पाणी शिरल्याने गोदावरीच्या पातळीत दुतोंडी मारुतीच्या मांड्यापर्यंत पाण्याची पातळी वाढली होती. दुपारी काहीवेळ पावसाने उसंत घेतल्याने ही पातळी दुतोंडी मारुतीच्या घोट्यापर्यंत पोचली होती. पण दुपारनंतर पुन्हा जोरदार पाऊस सुरु झाल्याने पातळी वाढण्यास सुरवात झाली आहे. रामकुंड भागातील मंदिरांना पाण्याचा वेढा पडला आहे. शिवाय गोदाकाठच्या शेतकऱ्यांमध्ये पुराच्या शक्‍यतेने भीतीचा गोळा उठला आहे. या पावसामुळे नाशिक-पुणे आणि मुंबई-आग्रा महामार्गावर खड्यांचे साम्राज्य तयार झाले आहे.

पाथर्डी-देवळाली ते पिंपळगाव खांब हा रस्ता खचल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. नवीन कसारा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक संथगतीने सुरु होती. मुंबईकडे जाणाऱ्या मालवाहतुकीच्या रेल्वेचे इंजीन इगतपुरीमध्ये रुळावरुन घसरले. मात्र मध्यरेल्वेची वाहतूक सुरळीत होती.

पोलिसांनी हलवले सुरक्षित स्थळी
गोदाकाठच्या काझीगढी येथे सकाळी अग्निशामक दलातर्फे धोकादायकस्थितीत राहणाऱ्यांना स्थलांतरीतच्या सूचना देण्यात आल्या. काही जणांनी विरोध केल्याने पोलिसांनी कुटुंबे सुरक्षित स्थळी हलवली. त्यातील काही जण नातेवाईकांकडे, तर काही जण संत गाडगेबाबा धर्मशाळेत गेले आहेत. कुलुप बंद घरांमध्ये पुन्हा कुणी राह्यला येते काय? याची माहिती दुपारी पोलिसांनी घेतली. दरम्यान, गटारीचे पाणी गोदावरीमध्ये शिरल्याने सकाळी गोदाकाठी दुर्गंधी पसरली होती. नाशिकमधील होळकर पूलाखालून 3 हजार 590 क्‍युसेस पाण्याचा प्रवाह सुरु होता. तसेच नांदूरमधमेश्‍वर बंधाऱ्यातून 3 हजार 228 क्‍युसेस पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.

जिल्हाभरातील पाऊस (आकडे मिलीमीटरमध्ये)
तालुक्‍याचे नाव आज सकाळी 8 पर्यंत 24 तासातील पाऊस
नाशिक 29.5
इगतपुरी 170 
त्र्यंबकेश्‍वर 135 (सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत 160)
दिंडोरी 34
पेठ 105 (सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत 101)
निफाड 21.3
सिन्नर 17
चांदवड 10
देवळा 15.4
येवला 8
नांदगाव 1
मालेगाव 3
बागलाण 4
कळवण 21
सुरगाणा 104.2

Web Title: high alert for Nashik and flood situation is danger in Trimbakeshwar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com