किवींना धूळ चारण्यास टीम इंडिया सज्ज

 किवींना धूळ चारण्यास टीम इंडिया सज्ज

वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : ताक घुसळून लोणी वर यावे तसे 10 संघांच्या मधून 2019 विश्वचषक उपांत्य सामन्याकरता 4 लायक आणि तगडे संघ वर आले आहेत. त्यातील पहिल्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाची गांठ न्युझिलंड संघाशी पडणार आहे. विराट कोहलीच्या शब्दात सांगायचे तर, ‘‘11 वर्षांपूर्वी मी आणि केन विल्यमसन 19 वर्षां खालच्या विश्वचषक उपांत्य सामन्यात खेळलो होतो. कल्पना नव्हती की आम्हीच दोघे आपापल्या देशाचे कप्तान होत मुख्य विश्वचषक स्पर्धेच्या  उपांत्य सामन्यात भिडू. गोष्ट साधी आहे, जो संघ दडपणाखाली चांगला खेळ करायची कला दाखवेल तो जिंकेल. अर्थातच भारतीय संघ उपांत्य सामन्यात चांगली करायला तयार आणि उत्सुक आहे. त्या सामन्यात मी केन विल्यमसनची विकेट काढली होती. तेव्हा माझी भेदक गोलंदाजी खेळायला त्याने तयार रहावे’’, कोहली आठवण काढताना म्हणाला.

मँचेस्टर शहरातील ऐतिहासिक ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर भारत वि न्युझिलंड सामना रंगणार आहे. अगोदरही हेच दोन संघ आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेत नाजूक क्षणी एकमेकांना भिडलेले आहेत. एक नक्की आहे की दोनही संघातील खेळाडू इतिहासाकडे बघत नाही आहेत. ‘‘सगळ्यांना कल्पना आहे की साखळी सामना आणि बाद फेरीतील सामन्यात काय फरक आहे. चांगली बाब ही आहे की चाहत्यांच्या अपेक्षांमुळे आम्हांला सतत दडपणाखाली खेळायची सवय आहे’’, कोहलीने हसत हसत सांगितले. 

बर्‍याच भारतीय चाहत्यांना  वाटते आहे की उपांत्य सामन्यात न्युझिलंड संघाला पराभूत करणे सोपे आहे. तशी बात नाहीये कारण चालू स्पर्धेत अडखळता प्रवास केला असला तरी न्युझिलंड संघात दम नक्कीच आहे. त्यांच्या फलंदाजांनी निराशा केल्याने संघाच्या प्रवासात अडचणी आल्या. चांगली सुरुवात केल्यावर न्युझिलंड संघाने नंतर एकामागोमाग एक सामने गमावल्याने शेवटी नेट रन रेटवर त्यांना उपांत्य फेरीत जाता आले. उपांत्य सामन्यात मार्टीन गपटील बरोबर कप्तान विल्यमसन आणि रॉस टेलरला भारतीय गोलंदाज किती लवकर बाद करू शकतात हे बघणे मजेचे ठरणार आहे.

बर्‍याच सामन्यात पहिली फलंदाजी करणारा संघ सामना जिंकत असल्याचे दिसून आले आहे. ‘‘धावांचा पाठलाग करताना असणार्‍या प्रचंड दडपणामुळे एक दोन निर्णय चुकले तरी सामन्यात पुनरागमन करणे  कठीण होऊन बसते. खेळपट्टीपेक्षा दडपणाखाली धावगती राखत पाठलाग करणे हे मोठे आव्हान आहे. नाणेफेक जिंकणे हरणे कोणाच्या हाती नसल्याने आम्ही त्याचा जास्त विचार करत नाही’’, कोहलीने मुद्दा मांडला.

भारतीय संघाची गोलंदाजी लक्षणीय सुधारल्याने संघातील बदल जगाला समजू लागला आहे. बुमराच्या सातत्यपूर्ण गोलंदाजीने सगळ्यांना मोहात पाडले आहे. हार्दिक पंड्याने प्रत्येक सामन्यात 10 षटके टाकायची मानसिक तयारी दाखवल्याने कप्तान कोहलीवरचे दडपण कमी झाले आहे. 5वा आणि बदली गोलंदाज असून हार्दिक पंड्याने 10 षटके मारा करताना कमी धावा दिल्या तसेच वेळोवेळी फलंदाजांना बाद करायला शक्कल लढवलेली दिसली. ‘‘पंड्याचा स्लो बाऊंन्सर फलंदाजांना त्रास देतो आहे तसाच विकेट किपींग करताना मलाही त्रास देतो आहे कारण चेंडू माझ्यापर्यंत पोहोचण्याअगोदर अजून एक टप्पा मधे पडत आहे’’, धोनी पंड्याच्या गोलंदाजीबद्दल कौतुक करताना म्हणाला.

शेवटच्या सामन्यात दिनेश कार्तिकला फलंदाजीची संधीच लाभली नसल्याने संघात केदार जाधवला जागा परत कधी मिळेल हे कळत नाहीये. एकाच सामन्यानंतर जडेजाला बाहेर बसवून चहलला परत बोलावले जायची शक्यता नाकारता येत नाही. 

पहिल्या उपांत्य सामन्याकरता ओल्ड ट्रॅफर्डवरचे कर्मचारी कष्ट करून चांगली खेळपट्टी बनवण्याकरता झटत आहेत. अशी खेळपट्टी जी 100 षटके चांगली राहील आणि दोनही संघांना समान संधी देईल. भारतीय संघ अचानक पहिल्या उपांत्य सामन्यात दाखल झाल्याने तिकिटांच्या काळ्या बाजाराला जोर चढला आहे. सामन्याच्या दिवशी सूर्य प्रकाश असला तरी ऊन कमी पडणार असल्याचा आणि हवेतील गारव्या बरोबर ढगाळ वातावरणाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. पावसाची शक्यता कमी आहे असेही हवामान खात्याने सांगितले आहे. 

Web Title: IND vs NZ Semi Final match preview

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com