जलतांडव! कोल्हापूर आणि सांगलीत भीषण पूरस्थिती...#MaharashtraFlood

जलतांडव! कोल्हापूर आणि सांगलीत भीषण पूरस्थिती...#MaharashtraFlood

कोल्हापूर/ सांगली - कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावरील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत असल्याने प्रमुख धरणांमधील विसर्ग वाढून नद्यांना महापूर आला आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापुरात बुधवारी पूरस्थिती धोक्याच्या पातळीवरच होती. पावसाने काहीशी उसंत घेतल्याने नाशिक, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, औरंगाबादला दिलासा मिळाला.

कोल्हापूर - ना वीज, ना पाणी, ना दूध, ना पेट्रोल अशा अवस्थेत गेली तीन दिवस कोल्हापूरकरांचे हाल होत आहेत. जिल्ह्यातील तब्बल ४४२ हून अधिक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडल्यामुळे प्रशासनालाही हात टेकावे लागले आहेत. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा) कोल्हापूर जिल्ह्यातील निम्मी गावे पुराने वेढली गेली असून, तीन दिवसांनंतर आज लष्कर, हवाई दलाची मदत कोल्हापूरला मिळाली. गेली दहा दिवस सलग होत असलेल्या अतिवृष्टीमुळे आणि धरणांतून होणाऱ्या पाण्याचा विसर्गाने कोल्हापूर पिण्याच्या पाण्यालाही महाग  झाले आहे.

तेरा वाहनांतून लष्कराचे १०६ जवान मंगळवारी रात्री पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पोचले; मात्र या महामार्गावरही सहा फूट पाणी असल्यामुळे ते दहा तासांनी कोल्हापूर शहरात पोचले. शहरातून अवघ्या अडीच किलोमीटरवर असलेल्या प्रयाग चिखली, आंबेवाडी परिसरातील सुमारे चारशेहून अधिक पूरग्रस्तांना त्यांनी दुपारी बाराच्या सुमारास मदतीचा हात दिला. दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतला. दुपारी तीनच्या सुमारास पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पूरस्थितीची पाहणी करून जे लागेल ती मदत देण्याचे आश्‍वासन दिले. खासदार संभाजीराजे हवाई दलाच्या विशेष विमानाने नौदलाचे प्रशिक्षित पाणबुडे २४ कमांडोंसह आले. हातकणंगले, शिरोळ तालुक्‍यातील अनेक गावांचा संपर्क तुटल्यामुळे तेथे हवाई मदत तातडीने देण्यात आली.

चोहोबाजूंनी संपर्क तुटला
कोल्हापूरचा चोहोबाजूंनी संपर्क तुटला असून, तब्बल २४ तास झाले तरी पूरग्रस्त मदतीसाठी आतुरलेले आहेत. शहरातील अंतर्गत रस्तेही बंद असल्यामुळे रुग्णालयांतील रुग्णांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यातही अपयश येत आहे. जिल्ह्यातील गगनबावडा, पन्हाळा, गारगोटी, सांगली या मार्गावरसुद्धा महापुराच्या पाण्याने थैमान घातले आहे. या भागातील पावसाचा जोर कायम असून तब्बल ५५ फुटांहून अधिक पाणीपातळी वाढली आहे. ती धोका पातळीपेक्षाही १२ फुटांनी जास्त आहे. कोल्हापुरात येणारे सर्वच मार्ग बंद आहेत. पंचगंगा नदीच्या राजाराम बंधाऱ्यावर बुधवारी दुपारी बारा वाजता ७४ हजार ६२१ क्‍युसेक एवढा विसर्ग सुरू होता. यामध्ये केवळ धरणातून सोडलेल्या पाण्याचा विसर्ग १७ हजार ४०० क्‍युसेक एवढा होता. वारणा धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग हा ३० हजार १३४ एवढा आहे. राधानगरी, तुळशी, कुंभी, कासारी यातून पंचगंगा नदीमध्ये साधारण एकवीस हजार चारशे इतका पाण्याचा विसर्ग होत आहे. 

दिवसभरात
लष्कराची रेस्क्‍यू टीम अकराच्या सुमारास कोल्हापुरात.
प्रयाग चिखलीत लष्कर आणि एनडीआरएफ. 
लष्कराच्या पथकाने चारशेहून अधिक पूरग्रस्थांना दिले जीवदान.
दुपारी तीन वाजता पंचगंगा नदीची पातळी ५५ फूट ६ इंच.
गोव्याहून चार पथके कोल्हापूरकडे.
सकाळी पावणेआठ वाजता दोन एअरक्राफ्ट आणि तीन हेलिकॉफ्टर दाखल.
गोवा कोस्ट गार्डचे एक हेलिकॉफ्टर दाखल- चार जवान आणि एक बोट.
दहा पथके मुंबईहून कोल्हापूरकडे.
गोव्याहून चार पथके कोल्हापुरात दाखल.

राज्यात ज्या भागात पूर ओसरला आहे तेथे पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा आणि वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे. पिण्याच्या पाण्याच्या नळजोडण्या पूर्ववत करण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत. दुर्गम भागात आदिवासी पाड्यांमध्ये तसेच पूरग्रस्तांसाठीच्या मदत छावण्यांमध्ये अन्नधान्य, पिण्याचे पाणी आदी सुविधा पुरविण्यात याव्यात. रेल्वे यंत्रणेला पाऊस आणि धरणांच्या विसर्गाबाबतची माहिती देण्याची व्यवस्था करावी.
-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

पश्‍चिम महाराष्ट्रात पंचगंगा व कृष्णा नदीतील पुराने थैमान घातले आहे. कोल्हापूर, सांगलीसारखी मोठी शहरे व अनेक गावांना पाण्याने वेढले आहे. लाखो नागरिक जीव वाचवण्यासाठी धडपडत आहेत. अन्न व निवाऱ्याची भीषण समस्या निर्माण झाली असताना मुख्यमंत्री मात्र त्यांच्या राजकीय प्रचारयात्रेत अडकून पडले होते. मागील काही दिवसांत पुराचा अंदाज आलेला असताना प्रशासनाने मंत्रालयस्तरावरून उपाययोजना करण्याची गरज होती. पण, मंत्रालयात प्रशासनाला कामाला लावणारी यंत्रणाच नव्हती.
-शरद पवार, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

Web Title: Heavy rainfall in kolhapur sangli

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com