वनविभागाच्या 6 तासांच्या थरारक कामगीरीनंतर बिबट्या बेशुद्ध

वनविभागाच्या 6 तासांच्या थरारक कामगीरीनंतर बिबट्या बेशुद्ध

उल्हासनगर - भाटिया चौक हे उच्चभ्रू वसाहतींचे ठिकाण. सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास या वसाहतीत आलेल्या बिबट्याने 12 फुटाच्या भिंतीवरून उडी मारून बंगल्यात प्रवेश केला.घरातील तिघे बाहेर पडले आणि वनविभागाच्या सहा तासांच्या थरारक कामगीरी नंतर बिबट्याला बेशुद्ध करण्यात यश आले. 

या चौकात एका इमारतीत राहत असलेल्या ऍड.लीना पंढरी यांनी सकाळी 7.30 च्या सुमारास बिबट्याला बघितले. हा बिबट्या सोनम क्लासेसच्या प्रिमाईस मध्ये शिरला. त्याला तिथे लपण्यासाठी काही दिसले नसल्याने तो गेट मधून बाहेर निघू लागला.क्लासेसचा शिपाई रवी कुंभार याला वाटल कुत्रा आहे म्हणून तो त्याला हाकलण्यासाठी मागे गेला. पण पुढील धक्कादायक चित्र बघून कुंभार घाबरून गेला.बिबट्याने क्लासेसच्या समोर रोडच्या पलीकडे असलेल्या सुरेश असरानी यांच्या बंगल्याच्या 12 फुटाच्या भिंती वरून आत उडी मारली. आतील तिघांनी दरवाजा बंद करून घाबरून बाहेर धाव घेतली.

बिबट्या एका बंगल्यात शिरल्याची माहिती वाऱ्या सारखी पसरताच सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील पाटील,वरीष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम पलंगे,सहाय्यक पोलीस निरीक्षक कौराती,उपनिरीक्षक दिलीप चव्हाण,अंकित दिघे,ठाणे उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर,परीक्षेत्र वनाधिकारी चंद्रकांत शेळके,अंबरनाथ वनपाल एन.एम.माने,उल्हासनगर वनपाल संजय पवार, पशुवन डॉ.पेठे आणि महाराष्ट्र शासन वनविभाग शीघ्र बचाव दल आदींनी धाव घेतली. प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केला.जमाव वाढू लागल्यावर अनेकदा पोलिसांवर त्यांना पांगवण्याची वेळआली.

हा बिबट्या बंगल्याच्या थ्री रुम किचन मध्ये शिरला होता. थेट दरवाजा उघडला तर तो हल्ला करण्याची शक्यता होती. ते गृहीत धरून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी भिंतीला ड्रिल मशीनच्या साहाय्याने होल पाडले. दुर्बिणीतून बिबट्या दिसताच डॉ.पेठे बंदुकीच्या टोकाला धनुष्यबाणात इंजेक्शन लावून ते होल मधून बिबट्याला मारले. अर्ध्या पाऊण तासाने बिबट्या बेशुद्ध झाल्याची खात्री झाल्यावर अधिकाऱ्यांनी दरवाजा उघडून बिबट्याला बाहेर काढले. बिबट्या पकडल्याचे समजताच जमावाने तो बघण्यासाठी धाव घेतली.मात्र तत्पुर्वीच वनविभागाच्या शीघ्र बचाव दलाच्या वाहनात आणलेल्या पिंजऱ्यात बिबट्याला बंदिस्त करण्यात आली.बिबट्याची रवानगी बोरिवली मधील संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये करण्यात आल्याची माहिती परीक्षेत्र वनाधिकारी चंद्रकांत शेळके यांनी दिली.

दरम्यान या परिसरात एक तबेला असून तेथील गुरांना कसारा जंगलातून ट्रक मधून चारा आणला होता.त्या ट्रक मध्ये बिबट्या चढला असणार आणि परिसरात आला असणार.अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com