Loksabha 2019 : भाजपचे कन्हैयाकुमार हेच खरे लक्ष्य!

Loksabha 2019 : भाजपचे कन्हैयाकुमार हेच खरे लक्ष्य!

बिहारात आघाडीचे राजकारण गतिमान झाले आहे. नितीशकुमार यांनी भाजपकडून तर राजदच्या समविचारी मोटेत आलेल्या घटक पक्षांनी आपापल्या जागांचा वाटा वसूल करत त्यांना नमते घ्यायला भाग पाडलंय. दुसरीकडे कन्हैयाकुमारला सर्वार्थाने बेगुसरायमध्ये घेरण्याचा डाव भाजपने आखलाय, त्याला अप्रत्यक्षरीत्या राष्ट्रीय जनता दलाने साथ दिली आहे.

भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशापाठोपाठ अधिकाधिक जागा मिळवण्यासाठी बिहारवर सारे लक्ष केंद्रित केले असले, तरी त्यातही त्यांचे ‘लक्ष्य’ आहे कन्हैयाकुमार! कन्हैया कोण याची आज देशाला ओळख करून देण्याची गरज नाही. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा माजी सरचिटणीस आणि देशविरोधी घोषणा दिल्याच्या संशयावरून थेट देशद्रोहाच्या आरोपाखाली खटल्यात गुंतवण्यात आलेला कट्टर डाव्या विचारांचा अवघ्या तिशीतील ‘जेएनयू’मधून डॉक्‍टरेट मिळवलेला कार्यकर्ता. त्याच्यावर देशद्रोहाचा आरोप करण्यात आला आणि अवघा देश जागा झाला.

त्यानंतर तुरुंगात काही काळ काढून बाहेर आल्यावर त्याच्या देशभरातील झंझावती दौऱ्यांनी तुफान उभे राहिले. गुजरात निवडणुकीत त्याने हार्दिक पटेल, तसेच अल्पेश ठाकूर यांच्या समवेत भाजप तसेच नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील भाषणांनी वादळ उभे केले होते आणि त्याचा फायदा काँग्रेसला निश्‍चितच झाला होता. हाच कन्हैया आता बेगुसरायतून कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे.

‘एकाकी’ म्हणण्याचे कारण एवढेच, की बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांचे राष्ट्रीय जनता दल, तसेच काँग्रेस आणि अन्य समविचारी पक्षांची आघाडी झाली असली, तरी त्यात कम्युनिस्टांना स्थान नाही. त्यातच कन्हैयाने आपला प्रचार सुरू केला तरी बरेच दिवस ‘राजद’ने तेथे आपला उमेदवार जाहीर केला नव्हता, त्यामुळे तेथे कन्हैयाविरुद्ध भाजप अशी थेट लढत होऊ शकली असती. मात्र, दोनच दिवसांपूर्वी ‘राजद’ने तेथून गेल्या निवडणुकीत पराभूत झालेले तनवीर हसन यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे आता बेगुसरायमधील लढत तिरंगी झाली आहे! मोदीविरोधात देशभर वातावरण निर्माण करण्यात मोठा वाटा उचलणाऱ्या कन्हैयासाठी एक जागाही न सोडल्यामुळे विरोधकांचे तथाकथित महागठबंधन कसे आत्मघातकी निर्णय घेत आहे, यावरच लख्ख प्रकाश पडला आहे. कन्हैयाने बेगुसरायमध्ये उभे केलेल्या झंझावातामुळे ‘वाचाळवीर’ असे बिरुद आपल्या वादग्रस्त वक्‍तव्यांनी संपादन केलेले केंद्रीय राज्यमंत्री गिरिराज सिंहही त्याच्या विरोधात लढायला तयार नव्हते. त्यांना आपला नवादा हाच मतदारसंघ हवा होता; मात्र अमित शहा यांनी त्यांना बेगुसरायमधूनच लढायला भाग पाडले आहे. 

तडजोडी, जागांवर पाणी
भाजपने बेगुसराय हे लक्ष्य केले असल्याचे त्यामुळे स्पष्ट झाले असून, अवघ्या देशभरातून पुरोगामी, तसेच डावे कार्यकर्ते कन्हैयाच्या निवडणूक प्रचारात सहभागी होणार आहेत. त्यामुळे साऱ्या प्रसारमाध्यमांचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे. बाकी बिहारमधील लढत ही भाजप आघाडी आणि राजद आघाडी यांच्यात मोठ्या चुरशीची होऊ शकते. नितीशकुमार पुनश्‍च एकवार भाजपच्या वळचणीला आल्यानंतर झालेल्या जागावाटप समझोत्यात भाजपला २०१४ मध्ये जिंकलेल्या सहा जागांवर पाणी सोडायला लागले होते. तशीच काहीशी गत सध्या ‘राजद’ची सूत्रे हाती असलेले तेजस्वी प्रसाद यांची झाली असून, त्यांनाही निम्म्या जागा मित्रपक्षांना द्याव्या लागल्या आहेत. इतक्‍या कमी जागा ‘राजद’ने यापूर्वी कधीच लढवल्या नव्हत्या! या समझोत्यानुसार बिहारमधील ४० जागांपैकी २० ‘राजद’ लढवणार असून, नऊ जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. जीतनराम मांझी हे खरेतर नितीश कुमार यांनीच मुख्यमंत्रिपदावर बसवलेले त्यांचेच सहकारी. मात्र, नितीश यांनी पुढे त्यांच्याशी दगाफटका केल्यानंतर मांझी आता या आघाडीत असून, त्यांना तीन तर उपेन्द्रसिंह कुशवाह यांना पाच जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे लालूंचे हे ‘राजद’ आता केवळ यादव आणि मुस्लिम मतांवरच सारी भिस्त ठेवून असल्याचे बोलले जात आहे. हे जागावाटप आठवडाभरापूर्वी झाले तेव्हा कन्हैयाच्या बेगुसराय मतदारसंघाबाबत फेरविचार होऊ शकतो, असे सांगितले होते. प्रत्यक्षात ‘राजद’ने आता कन्हैयाच्या विरोधात उमेदवार दिला आहे. त्यामुळे बिहारवर भाजपने लक्ष केंद्रित केले असले, तरी मोदी, शहा यांचे खरे ‘लक्ष्य’ कन्हैयाच असणार, हे स्पष्ट आहे.

Web Title: Loksabha Election 2019 kanhaiya kumar Politics BJP Bihar Aghadi

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com