महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस

महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस

पुणे  - राज्यात दीर्घ खंडानंतर पावसाने गुरुवारी (ता. १६) अनेक भागात हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मराठवाड्यातील जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांत तर विदर्भात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. गडचिरोली जिल्ह्यातील पेरमिली येथे सर्वाधिक २८६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सोमवारपर्यंत (ता. २०) उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे. 

राज्यात गुरुवारी सकाळपासूनच पावसाला सुरवात झाली. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, नांदेड या जिल्ह्यांतील काही भागात सकाळी हलक्या सरी बरसल्या. पूर्व विदर्भातील अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पश्चिम विदर्भातील काही भागात हलक्या सरी, तर अनेक भागात ढगाळ हवामान होते. मध्य महाराष्ट्रातील नगरमधील अकोले, नाशिकमधील इगतपुरी, पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, साताऱ्यातील महाबळेश्वर, कोल्हापुरातील काही भागात हलका पाऊस पडला. कोकणातही पावसाच्या सरी बरसत होत्या.  

कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पालघर जिल्ह्यातील बहुतांशी भागात पाऊस झाला. अंबोली येथे सर्वाधिक  २४८ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. तसेच घाटमाध्यावरही मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला. त्यामुळे भात पिकांना दिलासा मिळाला असून पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील अनेक भागात मध्यम ते जोरदार पाऊस झाला. खान्देशातील धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यांतील काही भागात हलका पाऊस पडला असून अनेक भागात ढगाळ हवामान होते. महाबळेश्वर येथे १४०. ८ मिलिमीटर तर लामज येथे १२२ मिलिमीटर पाऊस पडला. दुष्काळी असलेल्या सोलापूर जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली. कोल्हापुरातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला.

मराठवाड्यात दमदार
अडीच महिने पावसाचा खंड असलेल्या बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यांत पावसाने दमदार हजेली लावली. उस्मानाबादमधील मंगळूर येथे सर्वाधिक १५० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर तुळजापूर ६७, सालगारा ६२, सावरगाव ९७, इतकल १२५ मिलीमीटर पाऊस पडला. त्यामुळे खरिपातील पिकांना चांगलाच दिलासा मिळाला. गुरुवारी सकाळपासून मराठवाड्यात पावसाला सुरवात झाली होती.   

विदर्भात सर्वदूर पाऊस हजेरी
विदर्भातील परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांतील अनेक भागात सर्वदूर पाऊस पडला. विदर्भाच्या पूर्व भागात अतिवृष्टी झाली. त्यामुळे काही प्रमाणात पिकांचे नुकसान झाले असून घरांचीही पडझड झाली आहे. गडचिरोलीतील पेरमिली येथे सर्वाधिक पाऊस पडला. त्यापाठोपाठ आहेरी येथे २४६, जिमलगट्टा २२८, अल्लापाल्ली २२०, सिरोंचा ११९, बामणी १०७, मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे ओढे, नाले खळाळून वाहू लागले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com