पाणंदमुक्त 'एकुर्का' गाव घोटभर पाण्याला महाग

पाणंदमुक्त 'एकुर्का' गाव घोटभर पाण्याला महाग

एकुर्का - एकेकाळी ‘ते’ गाव पाणंदमुक्त होऊन जगाच्या नकाशावर गेले. दहा लाख रुपये बक्षीसही मिळविले. राज्यभर गवगवा झाला; मात्र आजच्या घडीला पाणंदमुक्त झालेल्या या गावातील वृद्ध, अपंग, तरुण, चिमुकल्यांना घोटभर पाण्यासाठी दिवसभर गावाबाहेरच्या दीड किलोमीटरवर असलेल्या डोहावर जावं लागत आहे. सरकारी दप्तरातून गायब झालेले ‘एकुर्का’ हे गाव आहे लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्‍यातलं. 

सकाळी साधारण ११ वाजता एकुर्का गावात पोहोचलो. रस्त्यावर काही ग्रामस्थ बसले होते. कोणी जारचे पाणी विकत आणले होते, तर कोणी जनावरांना घरी आणून टॅंकरने विकतचे पाणी पाजत होते. काही मुलीही सायकलवर नदीतून पाणी आणत होत्या. 

एकुर्का गावची सार्वजनिक विहीर २०१६ मध्ये पावसाच्या पाण्याने ढासळली. २०१८ मध्ये विहिरीचे तीन थर बांधले. सध्या या विहिरीचे थर बांधकाम आणि गाळ काढण्याचे काम सुरू आहे. हे गाळयुक्त पाणी गावच्या आडात सोडले. ते पाणी जलशुद्धीकरण यंत्राने शुद्ध  करताना त्यात गाळ गेला आणि तेव्हापासून ते बंद पडले. आजघडीला आडात टाकलेले गाळयुक्त पाणी उपसून जनावरांना पाजले जाते. एक हजार लिटर पाणी विकत घेण्यासाठी ३०० रुपये मोजावे लागतात, असे तीनशे रुपये अजून किती दिवस मोजावे लागणार, असा सवाल गुणाबाई केंद्रे यांनी केला. तर कर्नाटकातील बिदरहून कडबा आणावा लागतो, असे ब्रह्माजी बंडे यांनी सांगितले. गावातील बहुतांश बांधकामे ही पाण्याअभावी अर्धवट राहिली आहेत.

चलम्यावर भागतेय गावची तहान
एकुर्का हे गाव  २००५-०६ च्या दरम्यान पाणंदमुक्त झाले. दोन-तीन वर्षांपूर्वी दहा लाखांचा पुरस्कारही मिळाला; पण घोटभर पाणी मिळविण्यासाठी दीड किलोमीटरवर जाऊन डोहाजवळ केलेल्या चलम्यातून (हिरा) पाणी आणताना या वयात खूप त्रास होतो, हे सांगताना ७० वर्षांच्या मुद्रिकाबाई बंडे याचा कंठ दाटून आला होता. या चलम्यावरनं पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांची सकाळ-संध्याकाळ एकच झुंबड उडते. डोहाजवळ दोन चलमे केलेले आहेत. एकातून जनावरांना पाणी आणतात, तर दुसऱ्यातून तांब्याने घागरी, हंडे भरून पाणी आणले जाते. या चलम्यात त्या डोहाचे पाणी झिरपते. हे दोन्ही चलमे गावासाठी वरदान ठरत असले, तरी प्रशासनाच्या नाकर्तेपणाचे बळी हे ग्रामस्थ ठरले आहेत.

तीन महिन्यांपूर्वीच टॅंकरचा प्रस्ताव दिलेला आहे. त्यावर काहीच कारवाई झाली नाही. सोमवारी २९ एप्रिलला जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीतही आठवण दिली; पण प्रस्ताव अजून ग्रामसेवकाकडेच आहे. 
- शोभाबाई बंडे, सरपंच, एकुर्का.  

गावाच्या बाजूने तिरू नदी वाहते; पण बांधबंदिस्तीची कामे न झाल्याने आले पाणी वाहून जाते. अशी कामे झाली तर गावचा पाणीप्रश्न कायमचा संपेल.
- नामदेव भांगे, एकुर्का

Web Title: marathi news maharashtra droughts ekurla village water scarcity 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com