बिज माता राहीबाईला सरकारनं बांधून दिलेल्या बियाणे बँकेला गळती

बिज माता राहीबाईला सरकारनं बांधून दिलेल्या बियाणे बँकेला गळती

नगर - अकोले तालुक्यातील कोंभाळणे येथे विविध प्रकारची कडधान्ये, भाजीपाला व दुर्मिळ औषधी वनस्पतींचे अस्सल गावरान बियाणे जतन करण्याचे काम करणाऱ्या बीज माता राहीबाई पोपरे यांना सरकारने बांधून दिलेल्या गावराण बियाणे बँकेच्या खोलीला पहिल्याच पावसाने गळती लागली आहे. भिंत पाझरून खोलीत अचानक आलेल्या पाण्याने बियाण्यांचे दुर्मिळ वाण भिजण्याची चिन्हे दिसू लागल्याने राहीबाईंनी स्वतः धावपळ करून बियाणे दुसरीकडे हलवून वाचवले. यानिमित्ताने सरकारने त्यांना बांधून दिलेल्या घराचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

राहीबाई पोपरे यांनी औषधी वनस्पती, कडधान्ये व भाजीपाल्याचे जुने व दुर्मिळ वाण जपले आहे. या कामामुळे त्या राज्य आणि देशात चर्चेचा विषय ठरल्या असून 'बीजमाता' म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या या कामाची दखल सामजिक संस्था व प्रसिद्धी माध्यमांनी दखल घेतल्याने राहीबाईंचे काम जगासमोर आले. त्यांच्या या कामगिरीने मागील वर्षी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात राहीबाईंना त्यांच्याकडील दुर्मिळ गावराण बियाणे जतन करून ठेवण्यासाठी बीज बँक खोली व प्रदर्शन दालन बांधून देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर पाटील यांनी दिलेल्या शब्दाला जागून वेगाने सूत्रे हलवून गावराण बियाणे बँकेची देखणी इमारत बांधून ती राहीबाईंकडे सुपूर्द करण्यात आली. तेथेच दुर्मिळ बियाण्यांसह स्वतः राहीबाईही राहतात. त्यांची ही बियाणे बँक पहाण्यास राज्यभरातून अनेकजण येतात. मात्र, आता या इमारतीला पहिल्याच पावसाने गळती लागली आहे.

पहिल्या टप्प्यातील पावसाने या बांधकामाची पोलखोल केली आहे. जमिनीच्या बाजूने दगडी बांधकाम असलेल्या व वरच्या बाजूने वीट बांधकाम असलेल्या या दोन्ही बांधकामाच्या बरोबर मधोमध बांधकामात काही त्रुटी राहिल्याने पावसाचे पाणी या खोल्यांमध्येच पाझरायला सुरुवात झाली आहे. रविवारी सकाळी ही गोष्ट लक्षात आल्याने खुद्द राहीबाईदेखील चकीत झाल्या. अवघ्या काही महिन्यांपूर्वी बांधकाम केलेल्या भिंतीतून पाणी पाझरत होते. एका पुठ्ठ्याच्या खोक्यात काही बियाणे होते व ते खोके पूर्ण भिजले होते. राहीबाईंनी जीवापाड जपलेल्या काही बियाण्यांच्या वाणाला त्यामुळे धोका पोहोचला असता. त्यामुळे त्यांनी स्वतःच धावपळ करून सर्व बियाणे बाजूला हलवले.

बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह 
संगमनेर येथील साहित्यिक डॉ. संतोष खेडलेकर हे रविवारी सकाळी मुलाखतीच्या निमित्ताने राहीबाईंना भेटायला गेले होते. त्या वेळी त्यांच्या बियाणे बँकेची बाहेरून सुंदर दिसणारी देखणी इमारत आतून पावसाने गळत असल्याचे व त्यात बियाणे भिजू नये म्हणून राहीबाईंची धावपळ सुरू असल्याचे त्यांना दिसले. सरकारने बांधून दिलेल्या घरच्या भिंतीतून पाणी पाझरायला लागल्याने या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सरकारी काम उत्तम होऊच शकणार नाही का कधी, असा प्रश्न मनात निर्माण झाला आहे, अशी खंतही त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केली. या वेळी राहीबाईंनी आपल्या अनेक वर्षे जुन्या असलेल्या मातीच्या घरात त्यांना नेऊन, त्या घराच्या भिंतीतून पावसाचे थेंबभरदेखील पाणी झिरपत नसल्याचे आवर्जून दाखवले.

Web Title: maharashtra government build house to Rahibai is leakage

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com