मोदींच्या नव्या पर्वात महाराष्ट्रातले ७ शिलेदार सामील

मोदींच्या नव्या पर्वात महाराष्ट्रातले ७ शिलेदार सामील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ५८ मंत्र्यांचा शपथविधी गुरुवारी झाला. मोदी यांच्या दुसऱ्या पर्वातील या ‘जंबो’ मंत्रिमंडळात  नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, रावसाहेब दानवे, रामदास आठवले, संजय धोत्रे आणि अरविंद सावंत या महाराष्ट्राच्या चार शिलेदारांचा समावेश आहे. या सर्व मंत्र्यांचा थोडक्‍यात परिचय.

स्पष्टवक्ता व दिलखुलास व्यक्तिमत्त्व
नितीन गडकरी एक यशस्वी शेतकरी आणि पूर्ती समूहाचे अध्यक्ष आहेत. विधानपरिषद सदस्य, नागपूरचे पालकमंत्री ते केंद्रीय वाहतूक व जहाजबांधणी मंत्री, अशी देदीप्यमान कारकीर्द आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडले गेलेले ते दुसरे मराठी नेते ठरले. पहिले अध्यक्ष कुशाभाऊ ठाकरे होते. १९९५ ते १९९९ ते महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते आणि जवळपास ५५ उड्डाणपुल त्या काळात बांधले. तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संपर्क हे त्यांचे वैशिष्ट्य. पहिल्या मोदीपर्वातील सर्वांत प्रभावी मंत्री, रस्त्यांचे जाळे उभारण्याची किमया जनमत भाजपकडे टिकविण्यासाठी कामी आली. मोकळा स्वभाव व बोलण्याच्या स्पष्टवक्‍तेपणामुळे मोदींपर्यंत प्रतिकूल निरोप पोचविण्याची जबाबदारी अनेक नेते व कार्यकर्ते हक्‍काने सोपवत.

वीस वर्षांचा दांडगा अनुभव
कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले भारतीय जनता पक्षाचे नेते रावसाहेब दानवे हे २०१९च्या लोकसभा निवडणुकीत जालना लोकसभा मतदारसंघातून विक्रमी मते घेऊन पाचव्यांदा विजयी झाले आहेत. भाजपच्या गावशाखेच्या अध्यक्षापासून राजकीय प्रवेशाला प्रारंभ केला. दोन वेळा भोकरदनचे आमदार, पाच वेळा जालना लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले. ते १९८० पासून सक्रिय राजकारणात आहेत. त्यांनी १९८५ मध्ये पहिल्यांदा भाजपकडून विधानसभेची निवडणूक लढविली. पुन्हा १९९० मध्ये निवडणूक लढवून त्यांनी विधानसभेत प्रवेश केला. १९९५ मध्येही त्यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळविला.

१९९९ पासून  ते आजपर्यंत खासदार आहेत. २०१४ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागली होती. मात्र, नंतर त्यांच्याकडे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्षपद सोपविण्यात आल्याने त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

बॅंक कर्मचारी ते केंद्रीय मंत्री
प्रकाश जावडेकर यांच्या समावेशाने पुण्याला केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा संधी मिळाली आहे. शालेय जीवनापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध असलेल्या जावडेकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्या पहिल्या मंत्रिमंडळातही मंत्री म्हणून विविध खात्यांची जबाबदारी पार पाडली आहे. सर्वसाधारण कुटुंबातून आलेल्या, तसेच एक सामान्य बॅंक कर्मचारी म्हणून आयुष्याची सुरवात केलेल्या जावडेकर यांनी राज्यातही नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. पुणे पदवीधर मतदारसंघातून १९९० ते २००२ या काळात ते आमदार होते. पदवीधर मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढवताना पराभूत झाल्यानंतर पक्षाने २००३ मध्ये त्यांना केंद्रात पक्षाचे प्रवक्ते म्हणून जबाबदारी दिली. गेल्या पाच वर्षांत संसदीय कामकाज, वन आणि पर्यावरण, माहिती आणि प्रसारण यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी जावडेकर यांनी सांभाळली आहे.

फायर ब्रॅंड नेते
अवघ्या चार दशकांपूर्वी दलित पॅंथरचे फायर ब्रँड नेते म्हणून प्रसिद्ध असलेले व महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात प्रसिद्ध असलेले रामदास आठवले शिवसेना आणि भाजपच्या गोटात जाऊन बसले आहेत. दलित पॅंथरमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी अरुण कांबळेंना सोबत घेऊन महाराष्ट्रातील काँग्रेसबरोबर राजकारण सुरू करून राज्यातील जातीय पक्षांच्या विरोधात ठाम भूमिका घेतली होती. त्यामुळेच १९९८ मध्ये मुंबई उत्तर मध्यसारख्या राखीव नसलेल्या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. त्यापूर्वी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातही समाजकल्याण मंत्री म्हणून आठवलेंनी काम केले. काही काळानंतर त्यांनी शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. २०१४ मध्ये भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठविले आणि त्यानंतर दोन वर्षांनी त्यांची केवळ केंद्रीय राज्यमंत्रिपदावर बोळवण केली.

अकोल्याचा भूमिपुत्र
केंद्रातील सत्तेत अकोल्याच्या भूमिपुत्राला प्रथमच स्थान मिळाले आहे. सलग चारवेळा विक्रमी मताधिक्‍यांनी त्यांनी विजय मिळविला आहे. त्यांना कृषी क्षेत्रातील दांडगा अनुभव आहे. कृषी विज्ञान केंद्र आणि ‘महाबीज’सारख्या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी शेती व शेतकऱ्यांसाठी भरपूर काम केले आहे. त्यांच्या क्षमतेमुळे त्यांची केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या कृषी सल्लागार समितीचे सदस्य, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सदस्य, केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीपदी वर्णी लागली. २०१८ मध्ये त्यांना ‘कॅबिनेट’ मंत्रिपदाचा दर्जा देत महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. तत्पूर्वी, ते महाराष्ट्र राज्य रोजगार निवड मंडळाचे सदस्य होते. २००४ पासून ते अकोला येथे रेल्वेच्या अर्थसंकल्प समितीवर कार्यरत आहेत. बी. ई. मेकॅनिकल पदवीधर असलेल्या धोत्रे यांनी एलएलबीचीही पदवी मिळविली आहे.

तळमळीचा मुंबईकर नेता
शिवसेनेच्या दुसऱ्या पिढीतला तळमळीचा मुंबईकर कार्यकर्ता. नोकरदारांमध्ये शिवसेना वाढली ती नोकरीत मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाचे अस्त्र परजून. स्थानीय लोकाधिकारच्या माध्यमातून पहिल्या पिढीने या अन्यायाला वाचा फोडल्यानंतर अरविंद सावंत यांच्यासारख्या कार्यकर्त्याने सार्वजनिक उपक्रमात सेना रुजविली. महानगर टेलिफोन निगममध्ये सावंत यांचे मोठे काम. सुभाष देसाई यांच्याशी गोरेगाव परिसरातील कामामुळे जवळीक. त्याच आधाराने मातोश्रीच्या निकटवर्तीय वर्तुळात प्रवेश. महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत उत्तम कारकीर्द. त्यानंततर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ फेररचनेनंतर शिवसेनेने भाजपकडून मागून घेतल्यानंतर कुणीही उमेदवार नसल्याने सावंत यांनी दक्षिण मुंबईत काम करावे, असे आदेश. मराठी माणसाशी अविरत संपर्क, मतदारसंघातील काम, यामुळे मिलिंद देवरा यांच्यासारख्या दिग्गज उमेदवाराला हरवून दुसऱ्यांदा दक्षिण मुंबई राखली. शिवसेनेवरील कडवी निष्ठा हा त्यांच्या यशातील महत्त्वाचा घटक आहे.

Web Title: Modi Cabinet Maharashtra MP Cental Minister Politics

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com