बलिदान बॅजचे ग्लोव्ह्ज घालण्यास धोनीला परवानगी नाहीच

बलिदान बॅजचे ग्लोव्ह्ज घालण्यास धोनीला परवानगी नाहीच

लंडन :  भारतीय संघाचा यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीला विश्‍वकरंडक स्पर्धेत आपल्या ग्लोव्ह्जवरील "बलिदान' हे सन्मानचिन्ह वापरता येणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) शुक्रवारी रात्री हा निर्णय जाहिर केला.

धोनीच्या ग्लोव्ह्जवरील या सन्मानचिन्हावरून चांगलाच वाद रंगला होता. सन्मानचिन्ह वापरण्यात गैर काय ? असा प्रतिप्रश्‍न उपस्थित करून भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) "आयसीसी'ला सन्मानचिन्ह वापरण्यास परवानगी देण्याची मागणी केली होती. 

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात धोनीने वापरलेल्या ग्लोव्ह्जवर पॅराशूट रेजिमेंटचे "बलिदान' हे सन्मानचिन्ह असल्याचे समोर आले होते. या ग्लोव्ह्जवरील सन्मानचिन्हाचे छायाचित्र व्हायरल झाल्यावर धोनीला देशभरातून उस्त्फूर्त पाठिंबा मिळाला होता. क्रीडा क्षेत्रातूनही त्याच्या कृतीचे समर्थन करण्यात आले होते. मात्र, आयसीसीने नियमानुसार धोनीला ग्लोव्ह्जवर केवळ उत्पादन कंपनीचेच चिन्ह वापरण्यात येईल असे सांगून "बीसीसीआय'ला धोनीला हे सन्मानचिन्ह ग्लोव्ह्जवरून काढण्यास सांगावे अशी विनंती केली होती. 

"आयसीसी'ची विनंती प्रसिद्ध होत नाही, तोवर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री फवाद हुसेन यांनी धोनीच्या कृतीवर टिका केली. विश्‍वकरंडक क्रिकेट खेळायला गेला आहात, की महाभारत अशी खोचक टिपणी करून त्यांनी या वादात भर घातली होती. त्यामुळे हा वाद अधिक चिघळण्याची चिन्हे होती. "बीसीसीआय'च्या प्रशासक समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी धोनीला पाठिंबा देताना त्याने कुठल्याही आचारसंहितेचा भंग केला नाही असे मत व्यक्त केले. त्याचवेली धोनीच्या ग्लोव्ह्जवरील सन्मानचिन्ह कुठल्याही धर्म किंवा लष्कराचे प्रतिनिधीत्व करत नाही. प्रायोजक कंपनीच्या नियमाचेही उल्लंघन होत नाही. मग त्याने हे सन्मानचिन्ह वापरले यात गैर काय ? असा प्रतिप्रश्‍न उपस्थित केला होता. त्याचवेळी "बीसीसीआय'चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांना इंग्लंडमध्ये जाऊन आयसीसीशी या संदर्भात बोलण्यास सांगितले होते. 

जोहरी यांनी आयसीसीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतरही "आयसीसी' आपल्या निर्णयावर ठाम राहिले. क्रिकेटच्या उपकरणांवर केवळ प्रायोजक आणि क्रीडा साहित्य उत्पादन कंपनीचेच चिन्ह वापरण्यात येईल या नियमावर बोट ठेवून धोनीला ग्लोव्ह्जवरून सन्मानचिन्ह काढण्यास सांगितले. विनंती फेटाळल्यावर आता "बीसीसीआय' यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे क्रिकेट विश्‍वाचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: MS Dhoni can not be used balidan logo on gloves

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com