पहिल्याच पावसात मुंबईची झाली तुंबई

पहिल्याच पावसात मुंबईची झाली तुंबई

मुंबई : जून महिना संपत आला तरी मुंबईमध्ये पावसाला सुरवात झाली नव्हती. मात्र, आज अखेर पावसाची प्रतिक्षा संपली. मुंबई शहर आणि उपनगरात आज सकाळपासून जोरदार पावसाला सुरवात झाली आहे. 

पुढील काही तासांत मुंबईसह उपनगरात जोरादार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबईसह पालघर, भिवंडी, ठाणे, कल्याण, दादर, माहीम या भागांत पावसाने हजेरी लावली आहे. उपनगरातील कुर्ला, घाटकोपर, सकिनाका मालाड सबवे, अंधेरी, ठाणे येथील सखल भागात पाणी भरण्यास सुरवात झाली आहे. 

हिंदमाता,सायन परिसरात पाणी साचल्याने वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. मरोळ जंक्शन भवानीनगर येथे कारवर झाड कोसळले. सकाळ पासून कोसळणाऱ्या पावसाची कुलाबा 10 मीमी, पूर्व उपनगर 58 मीमी, पाश्चिम उपनगरात 28 मीमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

पावसामुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर खोळंबा
सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तिन्ही मार्गावर लोकल खोळंबा झाला आहे. पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरची लोकल वाहतूक सध्याच्या स्थितीत अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. मध्य रेल्वेवरची ठाण्यापासून पुढे वाहतूक खूप संत गतीने सुरू आहे. ठाण्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या लोकल 20 ते 25 मिनिट उशिराने धावत आहेत.  तसेच जोरदार पावसामुळे मुंबई विमानतळावर अनेक उड्डाणे विलंब झाला आहे . 

अनेक रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. माटुंगा रेल्वे स्टेशनवरही पाणी साचलं आहे. त्यामुळे मध्य रेल्वेचे मान्सूनपूर्व कामाचे पितळ उघडे पडले आहेत.

मुलूंड येथे 57 मि.मी पावसाची नोंद झाली असून लोकल वाहतूक सुरळीत सुरु आहे. उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर गाड्या उशिराने धावत आहेत. सायन, माटुंगा, ठाणे, भायखळा या भागातील रेल्वे रुळात पाणी साठल्याने लोकल धीम्या गतीने सुरू आहेत तर सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी-बेलापूर सर्कल जवळ वाहतूक कोंडी झाली आहे. तसेच सानपाडा ते वाशी दरम्यान वाहतूक कोंडी झाली आहे. 

जोरदार पावसामुळे मुंबई विमानतळावर अनेक विमानांची उड्डाणे उशीरा झाली आहेत. कल्याणमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली असून कल्याण पूर्वमध्ये तिसगाव नाक्यावरील 25 वर्ष जुने वडाचे झाड मध्येरात्री कोसळले. यामध्ये कोणाचीही जीवितहानी झालेली नाही. 

Web Title: Season first heavy rains cause traffic snarls in Mumbai

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com