थोरल्या भावामुळे टळला तुरुंगवास, अनिल अंबानीने मानले मुकेश आणि नीता अंबानीचे आभार

थोरल्या भावामुळे टळला तुरुंगवास, अनिल अंबानीने मानले मुकेश आणि नीता अंबानीचे आभार

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्‍यानंतर खडबडून जागे झालेल्या रिलायन्स कम्युनिकेशनने (आर-कॉम) अखेर सोमवारी (ता. 18) इरिक्‍सन कंपनीची 462 कोटींची देणी चुकती केली. अंतिम मुदतीच्या एक दिवस आधीच इरिक्‍सनचे पैसे परत केल्याने रिलायन्स कम्युनिकेशनचे प्रमुख अनिल अंबानी यांचा तीन महिन्यांचा तुरुंगवास टळला आहे. 

रिलायन्स कम्युनिकेशनने तब्बल 18 महिन्यांपासून इरिक्‍सनचे 580 कोटी थकवले होते. थकबाकी वसुलीप्रकरणी इरिक्‍सनने सर्वोच्च न्यायालयात रिलायन्स कम्युनिकेशनविरोधात अवमान याचिका दाखल केली होती. त्यावर गेल्या महिन्यात झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने इरिक्‍सनची थकबाकी चार आठवड्यांत परत करा; अन्यथा तीन महिने तुरुंगात जा, असा निर्वाणीचा इशारा दिला होता. पैसे परत करण्यासाठी अंबानी यांच्याकडे 19 मार्चपर्यंतची मुदत होती. मात्र, एक दिवस आधीच रिलायन्स कम्युनिकेशनने इरिक्‍सनचे पैसे परत केले आहेत. रिलायन्सने यापूर्वी 118 कोटी सर्वोच्च न्यायालयात जमा केले होते. तसेच, तीन कोटी रुपये दंडात्मक व्याजापोटी जमा केले. उर्वरित 458.77 कोटी सोमवारी इरिक्‍सनला देण्यात आले. याशिवाय, इरिक्‍सनला सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीकडूनही तीन कोटी मिळणार आहेत. 

अनिल अंबानी यांनी थोरले बंधू मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचे आभार मानले आहेत. कौटुंबिक मूल्य जपताना कठीण प्रसंगी पाठबळ दिल्याबद्दल मी आदरणीय बंधू मुकेश आणि नीता यांचा आभारी असल्याची भावना अनिल अंबानी यांनी व्यक्त केली. इरिक्‍सनची देणी दिल्यानंतर रिलायन्स कम्युनिकेशनने जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकात अंबानी यांनी सर्वांचे आभार मानले. 

रिलायन्स कम्युनिकेशनकडून व्याजासह 462 कोटी प्राप्त झाले आहेत. थकबाकी वसूल झाल्याने रिलायन्स कम्युनिकेशनविरोधातील दिवाळखोरीची याचिका आम्ही मागे घेत आहोत. 
- अनिल खेर, इरिक्‍सनची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील 

Web Title: Anil Ambani thanks elder brother Mukesh Ambani for paying Ericsson dues

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com