संरक्षण विभागाची औषधे काळ्या बाजारात

संरक्षण विभागाची औषधे काळ्या बाजारात

मुंबई -  संरक्षण विभागाची औषधे काळ्या बाजारात आल्याच्या प्रकरणात मुंबईतील घाऊक औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष दिलीप मेहता यांचा मुलगा ध्रुव मेहता याच्या विरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गुन्हा नोंदवला आहे. औषध विक्रेता संघटनेच्या अध्यक्षाचा मुलगाच या प्रकरणात अडकल्यामुळे हा गैरव्यवहार राष्ट्रीय स्तरावरचा असल्याचे बोलले जात आहे. 

मुलुंड येथील सेफलाईफ एन्टरप्रायझेसचे संचालक दीपेश ताराचंद गाला, ध्रुव दिलीप मेहता यांच्यासह भायखळ्यातील निवान फार्मास्युटिकल्सचे मालक विनीताल निक्षित लुनिया व निक्षित लुनिया यांच्यासह मेडलाईफ या ऑनलाईन औषधविक्रेत्या कंपनीचा संचालक प्रशांत सिंग, तुषार कुमार, सौरभ अग्रवाल व अन्य काही जणांवर एफडीएने गुन्हे दाखल केले आहेत. 

एफडीएच्या अंदाजानुसार, दिल्ली व मध्य प्रदेशातून या औषधांचा पुरवठा झाला आहे. पश्‍चिम बंगालमधूनही औषधांचा साठा आल्याचे सूत्रांनी सांगितले. 

मध्य प्रदेश आणि पश्‍चिम बंगालमधून संरक्षण विभागाची औषधे काळ्या बाजारात येत असल्याची बातमी ‘सकाळ’ने ७ फेब्रुवारीला प्रसिद्ध केली होती. याप्रकरणी एफडीएने केलेल्या कारवाईत ३० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. छाप्यांचे सत्र सुरू असून, अन्य आरोपींवरही लवकरच गुन्हा नोंदवला जाईल, अशी माहिती एफडीएच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी दिली. या संदर्भात घाऊक औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष दिलीप मेहता यांच्याशी प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.

औषधे, इंजेक्‍शनचा साठा जप्त
एफडीएच्या पथकाने छापे टाकून विल्डाग्लिप्टिन आणि सिटाग्लिप्टिन या गोळ्यांचा साठा जप्त केला होता. त्याचप्रमाणे लॅंटस सोलोस्टार इन्शुलिन इंजेक्‍शन आणि अर्सोलिअन गोळ्यांचा साठाही एफडीएने ताब्यात घेतला आहे.

या प्रकरणातील संशयित ध्रुव मेहता याला अगोदरच संघटनेतून काढून टाकले आहे. औषधांच्या ऑनलाईन विक्रीत त्याचा सहभाग असल्याचे समजल्यानंतर ही कारवाई केली. संरक्षण विभागाच्या औषध गैरव्यवहारात दोषी आढळल्यास दिलीप मेहता यांच्यावरही कारवाई केली जाईल. 
- जगन्नाथ शिंदे, अध्यक्ष,  अखिल भारतीय औषध विक्रेता संघटना व महाराष्ट्र राज्य औषध विक्रेता संघटना

Web Title: The complaint has been registered against the son of Dilip Mehta for Black market of drugs

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com