मुंबईत पावसाचं आगमन झालं तरीही रस्त्याची कामे मात्र सुरूच 

मुंबईत पावसाचं आगमन झालं तरीही रस्त्याची कामे मात्र सुरूच 

मुंबई - सध्या मुंबई शहरभर सुरू असलेली मेट्रो, मोनो, रस्ते आणि पर्जन्य जलवाहिन्यांची कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी करण्याची गरज होती. मात्र, पावसाच्या सरी सुरू झाल्या तरी कामे अजूनही सुरूच आहे. कंत्राटदारांनी अर्धवट सोडलेल्या कामांमुळे मुंबईत पावसाळ्यात पाणी भरण्याची ठिकाणे गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढली आहेत. सुमारे २७५ ठिकाणी पाणी भरण्याची शक्‍यता आहे. पाणी भरणाऱ्या ठिकाणी पाण्याचा उपसा करण्यासाठी २५० ठिकाणी पंप बसविण्यात आले आहेत. 

शहरात मान्सूनपूर्व पावसाने जोर धरला असल्याने कंत्राटदारांनी कामे अर्धवट सोडली आहेत. मोनो-मेट्रोच्या कामांनी रस्ते अडवले आहेत. मुंबईतील मुख्य रस्ते त्या कामासाठी खोदून ठेवण्यात आले आहेत. पावसाळ्यात रस्ते खोदून ठेवलेल्या ठिकाणी पाणी भरल्यास वाहतुकीचा बोजवारा उडण्याची शक्‍यता आहे. त्या कामांमुळे पावसाळ्यात पाणी भरण्याची ठिकाणे वाढण्याची शक्‍यता आहे. वडाळा, घाटकोपर, मुलुंड आणि ठाणे मार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. त्या कामासाठी लालबहादूर शास्त्री मार्ग खोदून ठेवण्यात आला आहे. त्यात मोठमोठे बॅरिकेट्‌स लावण्यात आले आहेत. रस्त्यावर रोजच वाहतूक कोंडी होत आहे. त्या कामाचा मोठा फटका पावसाळ्यात बसण्याची शक्‍यता आहे. मोनोच्या कामाचीही मोठी अडचण पावसाळ्यात होणार आहे. 

रस्त्यांलगतच्या नाल्याची आणि पर्जन्य जलवाहिन्यांची कामे अपूर्ण आहेत. ती कामे पावसाळ्यापूर्वीच पूर्ण व्हायला हवी होती. मात्र, कंत्राटदारांनी तीही पूर्ण केलेली नाहीत. कामांसाठीचे साहित्य रस्त्यांच्या बाजूला पडून आहे. जोरदार पाऊस सुरू झाल्यास ते पर्जन्य जलवाहिन्यांमध्ये जाऊन त्या बंद होऊ शकतात. नाल्यांमधून काढण्यात आलेला गाळही उचलण्यात आलेला नाही. सर्व कामांमुळे पाणी तुंबण्याची ठिकाणे वाढली असून ती २७५ पर्यंत  गेली आहेत. 

पाणी साचण्याची ठिकाणे वाढणार असल्याची शक्‍यता ओळखून आताच २५० ठिकाणी साचलेल्या पाण्याचा उपसा करण्यासाठी २५० पंप बसवण्यात आले आहेत.

बंदिस्त नाल्यांची सफाई अपूर्ण 
मुंबईच्या शहर भागात बंदिस्त नाले आहेत. त्या नाल्यांची सफाईकामे ३१ मेपूर्वी पूर्ण करणे आवश्‍यक होते. मात्र, तीही झालेली नाहीत. पहिल्या पावसानंतर सफाई कामे सुरू असल्याचे दिसून येत आहे. सायन, माटुंगा, कुर्ला, दादर, माहीम, परळ, हिंदमाता, लालबाग आदी सखल भागांत पावसाळ्यात पाणी भरते. त्या भागात बंदिस्त पर्जन्य जलवाहिन्या आहेत. त्यांची साफसफाई झालेली नाही. त्यामुळे तिथेही पाणी तुंबण्याची शक्‍यता आहे.

Web Title: development works in Mumbai

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com