मुंबईत सहाच्या सहा जागा जिंकत भाजप-शिवसेना युतीचा षटकार

  मुंबईत सहाच्या सहा जागा जिंकत भाजप-शिवसेना युतीचा षटकार

मुंबई - देशभरात मोदी नावाच्या सुनामीत विरोधकांची दाणादाण उडालेली असताना राजधानी मुंबईतही कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीची पुरती धूळधाण झाली आहे. सहाच्या सहा जागा जिंकत भाजप-शिवसेना युतीने पुन्हा षटकार ठोकला. 2014 च्या निवडणुकीत युतीने सर्व जागा जिंकल्यानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी मुंबईत परत उभीच राहू शकली नाही. महानगरपालिकेत धुव्वा उडाल्यानंतर आता परत लोकसभेतही आघाडीच्या हाती भोपळा आला आहे.

मुंबईत शिवसेना व भाजपचा प्रचंड टोकाचा संघर्ष पाच वर्षांपासून सुरू होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर थेट आरोप करीत भाजपने शिवसेनेची कोंडी केली होती. अशा स्थितीतही युती झाल्याने स्थानिक शिवसैनिकांचे मनोमिलन होईल की नाही, अशी शंका होती. त्यात मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी प्रचारात उडी घेत भाजप व शिवसेनेला लक्ष्य केले होते. मराठी-अमराठी अशी मतविभागणी होण्याचीही शंका व्यक्‍त केली जात होती. मात्र, मोदी नावाचे गारूड मुंबईकर मतदारांच्या मनावर पक्के बसल्याचे चित्र निकालानंतर स्पष्ट झाले. शिवसेनेचे तीन व भाजपचे तीन, असे सर्व उमेदवार विजयी झाले.

कॉंग्रेसमध्ये असलेली प्रचंड दुफळी, प्रचारातला विस्कळितपणा, नेते व पदाधिकारी यांच्यातले टोकाचे मतभेद आणि पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची एकही सभा अथवा रोड शो झाला नसल्याने कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये कुठेही आक्रमकता दिसत नव्हती. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांची उचलबांगडी करण्यात आली. मुंबईत कॉंग्रेस कुठेही निवडणुकीत दिसत नसताना अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांच्या उमेदवारीमुळे कॉंग्रेस चर्चेत आली. पण, ऊर्मिला मातोंडकर यांचाही दारुण पराभव झाला.

शिवसेना व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एकदिलाने युतीच्या उमेदवारांचे काम केल्याने हे प्रचंड यश कायम राखता आल्याची प्रतिक्रिया दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते व्यक्‍त करीत आहेत.

Web Title: Loksabha Election Results Yuti Win BJP Shivsena Congress NCP Politics

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com