मुंबईकरांत वाढतेय क्रूझची क्रेझ

मुंबईकरांत वाढतेय क्रूझची क्रेझ

मुंबई - अथांग समुद्रातून जहाजातून फिरण्याची मजा अनुभवणाऱ्या मुंबईकरांची संख्या वाढत असून, त्यांच्यात क्रूझची क्रेझही वाढते आहे. मुंबईतून मुंबई-गोवा मार्गावर नुकत्याच सुरू झालेल्या ‘आंग्रिया क्रूझ’चे बुकिंग हाऊसफुल्ल झाले असून, कर्णिका या नव्या क्रूझच्या बुकिंगलाही पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आंग्रिया सुरू झाल्यापासून मुंबई-गोवा मार्गावर दररोज ३०० ते ४०० जण प्रवास करत असून, आतापर्यंत दोन हजारपेक्षा जास्त पर्यटकांनी ‘आंग्रिया’वर क्रूझ पर्यटन अनुभवले आहे. तसेच जूनपर्यंत ‘आंग्रिया’चे बुकिंग फुल झाले आहे, अशी माहिती ‘आंग्रिया’च्या संचालिका लीना कामत यांनी दिली. क्रूझवर वैयक्तिक पार्टी किंवा लग्नासाठीही बुकिंग करता येत असून, त्यासाठी तीनचार हॉल उपलब्ध आहेत आणि नोव्हेंबरमध्ये तीन विवाह सोहळ्यांचे बुकिंग झाले आहे. क्रूझवर गोवा किंवा मुंबई यापैकी कोठेही भरसमुद्रातही हा सोहळा करता येईल, असे कामत यांनी सांगितले.

मुंबई ते गोवा प्रवासासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या (बीपीटी) कर्णिका क्रूझचे ऑनलाईन बुकिंग सुरू असून कंपनीद्वारेही बुकिंग होत आहे. ‘वीणा वर्ल्ड’ने आपल्या संकेतस्थळावर ‘कर्णिका’चे स्वतंत्र बुकिंग उपलब्ध करून दिले आहे. ‘कर्णिका’मधून एका वेळी दोन हजार प्रवासी जाऊ शकतात. संध्याकाळी ५ वाजता ही क्रूझ मुंबईवरून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता गोव्याला पोहोचेल. एप्रिल ते मेदरम्यान या क्रूझच्या मुंबई-गोवा-मुंबई अशा १५ फेऱ्या होतील.

सिंगापूर, मलेशिया क्रूझ पर्यटनामध्ये क्रूझ रात्री प्रवास करून सकाळी पर्यटनस्थळी थांबते, अशी माहिती ‘केसरी टूर्स’चे संचालक शैलेश पाटील यांनी दिली. ‘कोस्टा क्रूझ’च्या मुंबई ते कोचीन आणि मुंबई ते मालदीव प्रवासाला भारतीय पर्यटकांची पसंती आहे. त्याबद्दल ‘कोस्टा क्रूझ’च्या संचालिका नलिनी गुप्ता म्हणाल्या, भारतीय पर्यटकांकडून क्रूझ पर्यटनाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे, पण भारतीय पर्यटकांना तीन ते सात दिवसांपलीकडे क्रूझवर राहण्यास आवडत नाही. त्यामुळे भारतीय पर्यटक छोट्या अंतरावरील ठिकाणांसाठी क्रूझचे बुकिंग करतात. उन्हाळी सुट्ट्यांचा हंगाम सुरू असल्याने क्रूझला खूप चांगला प्रतिसाद मुंबई-गोवा पर्यटकांकडून मिळत आहे. १५ फेऱ्यांचे बुकिंग ७०-८० टक्के झाले आहे, अशी माहिती ‘कर्णिका’चे मुख्य कार्यकारी अधिकारी जर्गन बेलोम यांनी दिली.

सात ते २० हजार भाडे
मुंबई ते गोवा प्रवासासाठी मुंबईवरून आंग्रिया व कर्णिका या क्रूझ उपलब्ध आहेत. ‘आंग्रिया’वर बुकिंगची सुरुवात सात हजारपासून; तर ‘कर्णिका’चे बुकिंग तीन दिवसांसाठी १८ हजार रुपये आहे. क्रूझवरील सर्वांत चांगल्या सूटसाठी ११ हजार रुपये मोजावे लागतात. बुकिंगमध्ये राहण्याची सोय, रात्रीचे बुफे जेवण, सकाळचा नाश्‍ता समाविष्ट आहे. सिंगापूर, मलेशिया क्रूझ पर्यटनामध्ये दोन, तीन व सात दिवसांचे पॅकेज असून, दोन दिवसांसाठी प्रतिप्रवासी बुकिंग २० हजार रुपये आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com