राजकारण समाजकारणाशी निगडित असले पाहिजे, तरच भारताचा विकास होईल - नितीन गडकरी

राजकारण समाजकारणाशी निगडित असले पाहिजे, तरच भारताचा विकास होईल - नितीन गडकरी

नागपूर - राजकारणात अनेकदा विचारभिन्नतेपेक्षा विचारशून्यतेचा अनुभव अधिक येतो. कारण, या श्रेत्रात वावरत असलेले ९० टक्के लोक ‘करिअर’ म्हणून राजकारणाला बघायला लागले आहे. राजकारण नेहमीच समाजकारणाशी निगडित असायला हवे. त्यानेच भारताचा विकास होईल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यानी केले.

दीनदयाल शोध संस्थान, ताई सुकळीकर सेवा प्रतिष्ठान व भाऊराव देवरस मानव संसाधन विकास शोध प्रतिष्ठानच्या वतीने सुमतीताई सुकळीकर यांचा स्मृतिदिन कार्यकर्तादिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्‍वभूमीवर आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून नितीन गडकरी बोलत होते.

अध्यक्षस्थानी प्रभाकरराव मुंडले तर विशेष अतिथी म्हणून राजकीय विश्‍लेषक यशवंत देशमुख उपस्थित होते. सोबतच प्रा. योगानंद काळे व कौटुंबिक न्यायालयाच्या माजी सेवानिवृत्त न्यायाधीश मीरा खडक्कार 
उपस्थित होते. यावेळी यादवराव देशमुख यांनी संपादित केलेल्या ‘लोकमाता ताई’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

भारतीय विचार व मूल्यांचे विदेशात प्रचंड महत्त्व आहे. मात्र, आपल्याला त्याची जाणीव नाही. ताई सुकळीकर यांच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी विचार व संस्कारांचा समाजात प्रचार-प्रसार करण्याची गरज नितीन गडकरी यांनी व्यक्‍त केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिसस्पर्शाने अनेक व्यक्ती मोठे झाले. अनेक मोठे नेते काळाच्या पडद्याआडदेखील गेले. मात्र, संघाने व्यक्तीनिर्माणावर भर ठेवल्यानेच व्यक्ती गेल्यानंतरही त्याचे विचार पुढील पिढ्या समाजापर्यंत पोहोचवत आहेत. आज राजकारणाबाहेर राहून समाजासाठी मौलिक कार्य करणाऱ्यांची गरज आहे. आपल्या विचारांवर श्रद्धा ठेवून काम केले, तर समाजाच्या हिताचे परिवर्तन होऊ शकते, असेही ते म्हणाले. प्रास्ताविक मीरा खडक्कार यांनी केले. रेखा देशपांडे यांनी पुस्तक परिचय दिला. विनोद वखरे व शुभांगी बागडदेव यांनी पुलवामा येथे शहीद जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गीत सादर केले. संचालन विवेक तरासे यांनी केले, तर शिरीष भगत यांनी आभार मानले.

सामाजिक जीवनात कटुता
काही काळापासून सामाजिक जीवनात कटुता दिसून येत आहे. एखाद्याने विरोधकांची प्रशंसा केली, तर त्याच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती केली जाते. हे चित्र चांगले नाही, असे मत यशवंत देशमुख यांनी व्यक्त केले.

Web Title: Nitin Gadkari Talking

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com