कोट्यवधींची शेतकऱ्यांची फसवणूक टळणार ; कृषी विभागाची 'ऍप'द्वारे साथ

कोट्यवधींची शेतकऱ्यांची फसवणूक टळणार ; कृषी विभागाची 'ऍप'द्वारे साथ

नाशिक - द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता ८ हजार कोटींचे मार्केट स्वत:च्या हाती घेण्याचा निर्धार केला आहे.

शेतकऱ्यांनी गुणवत्तापूर्ण अन्‌ निर्यातक्षम उत्पादनाचे तंत्र अवगत केले असले, तरीही हे ‘मार्केट’ व्यापाऱ्यांच्या हातात आहे. त्यामुळे देशांतर्गत आणि परदेशातील बाजारपेठेत विकल्या जाणाऱ्या भावातून मिळणाऱ्या पैशांवर शेतकऱ्यांना समाधान मानावे लागते. त्यातून वर्षाला सर्वसाधारणपणे २५० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या घटना घडतात, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने शेतकऱ्यांना एकत्र करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यास कृषी विभागाने साथ देण्याचे ठरवले आहे. कृषी विभागातर्फे ‘मॅन्युअली’ गावनिहाय द्राक्षांच्या वाणासह क्षेत्राचे संकलन करून ‘ॲप’ विकसित करण्याचे ठरवण्यात आले आहे. तसेच द्राक्षांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या ६ तालुक्‍यांत शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना एकत्रीकरणाच्या आणि शेतकऱ्यांच्या हातात ‘मार्केट’ ठेवण्याविषयीची माहिती दिली जाणार आहे. पुढील टप्प्यात शेतकऱ्यांच्या कंपन्या स्थापन केल्या जातील. या कंपन्यांच्या माध्यमातून द्राक्षांचे भाव निश्‍चित करत जागतिक स्तरावर मागणी असलेल्या द्राक्षांच्या वाणाच्या उत्पादनाला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सप्टेंबरपासून छाटणीमध्ये शेतकरी गुंतणार असल्याने आता उरलेल्या काळात शेतकऱ्यांच्या बैठकी आणि कार्यशाळा या बाबी पूर्णत्वास नेल्या जाणार आहेत.

आता घडतंय काय?
जागतिकस्तरावर नेमक्‍या कोणत्या वाणाला आणि किती मागणी आहे याची माहिती सर्वदूर शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाही. त्यामुळे छाटणीच्या वेळापत्रकापासून ते वाणाच्या निवडीपर्यंतची शिस्त राहिलेली नाही. हे कमी काय म्हणून हंगामात एकदम द्राक्षे बाजारात येताच, भाव कोसळतात आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. शिवाय किलोला २८ ते ३० रुपये भाव मिळालेली द्राक्षे ही ५० ते ६० रुपये किलो भावाने विकलेल्या द्राक्षांसमवेत देशातंर्गत आणि परदेशातील बाजारपेठांमध्ये पोचतात. हेही कारण भाव ढासळण्यास कारणीभूत ठरते. हीच परिस्थिती यंदा घडली. युरोप आणि इंग्लंडमधील ‘सुपर मार्केट’मध्ये कमी भावाने घेतलेल्या द्राक्षांची व्यापाऱ्यांनी ‘ऑफर’ दिली आणि भाव कोसळल्याची घटना घडली. त्यावर उपाय म्हणून आता शेतकरी कंपन्यांच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना भाव निश्‍चित करून देणार आहेत.

युरोप आणि इंग्लंडमधील ‘सुपर मार्केट’मध्ये पाच किलो द्राक्षांना १० युरो भाव मिळणे अपेक्षित होते. पण आठवड्याला ७०० कंटेनर खपणाऱ्या बाजारपेठेत १ हजार कंटेनर पोचले आणि त्यात कमी भावाच्या द्राक्षांचा समावेश असल्याने भाव निम्म्याने गडगडला. त्यामुळे निर्यातीसाठी द्राक्षे घेतलेल्या व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना नेमके किती पैसे मिळतील? याबद्दलचे प्रश्‍नचिन्ह आहे. हे कमी काय म्हणजे, निर्यातीसाठी माल घेतलेल्यांपैकी अनेकजण ‘नॉट रिचेबल’ झालेत. त्यासंबंधी शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्यात 
आहेत.

Web Title: Grapes Farmer Cheating Agriculture Department App Support

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com