सेवेतील शिक्षकांना शेवटची संधी, पात्रता परीक्षेची तारीख ठरली!

सेवेतील शिक्षकांना शेवटची संधी, पात्रता परीक्षेची तारीख ठरली!

इगतपुरी (जि. नाशिक) - प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्ती मिळण्यासाठी शिक्षण हक्क कायद्याने प्रस्तावित केलेली शिक्षक पात्रता परीक्षा राज्य परीक्षा परिषदेतर्फे २२ सप्टेंबरला प्रस्तावित करण्यात आली आहे. राज्यात होऊ घातलेल्या शिक्षक भरतीच्या दृष्टीने आणि सेवेत असलेल्या व पात्रता धारण न केलेल्या शिक्षकांसाठी ही शेवटची संधी असल्याने या वेळच्या परीक्षेला महत्त्व आहे.

राज्यात प्राथमिक शिक्षक म्हणून सेवेत समाविष्ट होण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. राज्य शासनातर्फे अनेक वर्षांनंतर शिक्षक भरती सुरू करण्याची भूमिका घेण्यात आली आहे. तर राज्य शासनातर्फे अनेक जिल्हा परिषदांनी मध्यंतरीच्या काळात शिक्षक भरतीस स्थगिती असतानाही शिक्षक मान्यता दिल्याची बाब समोर आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या व नियुक्ती दिलेल्या शिक्षकांचे वेतन बंद करून त्यांना सेवेतून कमी करण्याबाबतचे आदेश यापूर्वी प्रशासनाने दिले होते. दरम्यान, राज्य शासनाने अशा नियुक्त झालेल्या शिक्षकांना अजून एक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने यापूर्वी आदेश दिले आहेत.

राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याचे अधिकार राज्य परीक्षा मंडळाला असून, वर्षातून एकदा ही परीक्षा घेण्याचे प्रस्तावित धोरण आहे. येत्या शैक्षणिक वर्षात सप्टेंबरमध्ये परीक्षेला परवानगी द्यावी, असा प्रस्ताव परीक्षा परिषदेतर्फे शासनाला पाठविण्यात आल्याचे वृत्त आहे. जून, जुलै, ऑगस्ट या कालखंडात पावसाळ्याचे दिवस असल्याने राज्यभर परीक्षा घेणे, त्यासाठीच्या सुविधा उपलब्ध करून देणे अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे परीक्षा घेण्यासाठी २२ सप्टेंबर हा दिनांक परीक्षा घेण्याच्या दृष्टीने योग्य असल्याने शासनाकडे परवानगी मागण्यात आली आहे.

पाऊणलाख विद्यार्थी उत्तीर्ण 
राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा २०१० मध्ये अस्तित्वात आलेल्या शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीनंतर सुरू करण्यात आली. २०१३ नंतरच्या शिक्षक भरती प्रक्रियेला ही पात्रता अनिवार्य करण्यात आली. प्रारंभी काही लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. मात्र, यश मिळत नसल्याने अनेकांनी हा मार्ग कायमचाच बंद केला. दरम्यान, राज्यात आजही पाऊणलाख विद्यार्थी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असल्याचे चित्र आहे.

Web Title: Teacher Eligibility Test Teacher recruitment Important

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com