नवी मुंबईमध्ये अनधिकृत बांधकामांचा जोरदार सपाटा

नवी मुंबईमध्ये अनधिकृत बांधकामांचा जोरदार सपाटा

नवी मुंबई - सिडकोकालीन इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी वाढीव बांधकामे करण्याचा जोरदार सपाटा लावला आहे. सिडकोने नेरूळ, जुईनगर, सानपाडा या भागात अत्यल्प व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी दोन मजली इमारती व बैठ्या चाळी तयार केल्या आहेत. त्यामध्ये विनापरवानगी वाढीव बांधकाम केले जात आहे. 

ई-वन प्रकारातील इमारतींमध्ये खालच्या मजल्यावरील गॅलरीच्या भागात स्लॅब टाकून त्याआधारावर थेट दोन मजले बांधले जात आहेत; तर बैठ्या चाळींवर स्लॅबच्या साह्याने थेट दोन मजले चढवून चक्क तीन मजल्यांच्या इमारती उभारल्या जात आहेत. 

1980 च्या दशकात सिडकोने नवी मुंबईची निर्मिती केली. तेव्हा सिडकोने शहरातील नागरीकरणाचा समतोल राखण्यासाठी ऐरोली, कोपरखैरणे, घणसोलीप्रमाणेच वाशी, सानपाडा, जुईनगर व नेरूळमध्ये अल्प व अत्यल्प उत्पन्न गटांतील नागरिकांसाठी इमारती व बैठ्या चाळी तयार केल्या. सुरुवातीला राहण्यास कोणीच तयार नसलेल्या चाळींमध्ये 1990 नंतर मुंबई व ठाण्यात कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांनी घरे घेतली. तेव्हा कुटुंबातील मर्यादित असणारी सदस्यसंख्या आता हळूहळू वाढून सरासरी पाच जणांचे एक कुटुंब झाले आहे. सदस्यसंख्या वाढली असली तरी घराचे आकारमान न वाढल्यामुळे 300 चौरस फुटांचे वन रूम किचन घर कमी पडू लागले. त्यामुळे अनेकांकडून घरासमोर असलेल्या गॅलरीवर छत टाकून छोटेखानी खोली तयार केली जात होती; तर काही जणांकडून ओटल्यांवर पत्रे टाकून अथवा स्लॅब टाकून एक मजली बांधकाम केले जात होते; परंतु गेल्या पाच वर्षांत भाडेकरूंची संख्या वाढल्याने नेरूळ, जुईनगर, सानपाडा या भागात सिडकोकालीन इमारतीमध्ये वाढीव बांधकामांचे पेव फुटले आहे. 

ई-वन प्रकारातील सोसायट्यांमध्ये तळमजल्यावर स्लॅब टाकून थेट दोन मजले वाढवले जात आहेत. बैठ्या चाळींमध्येही एका मजल्यावरून तीन मजले उभारण्याची मजल गेली आहे. वाढवलेल्या खोल्या भाड्याने देऊन घरखर्च भागवण्याचा प्रकार चाळींमध्ये सुरू आहे. सद्यस्थितीत नेरूळमध्ये सेक्‍टर 2, 3, 8 आणि 10 मध्ये बैठ्या चाळी व दोन मजली इमारतींमध्ये वाढीव बांधकामे वेगाने सुरू आहेत. 

पायाभूत सुविधांवर ताण 
सिडकोकालीन इमारतींच्या आकारमानानुसार लोकसंख्या विचारात घेऊन मलनिःसारण वाहिन्या, पाणीपुरवठा, वाहनतळ आदी पायाभूत सुविधा प्रशासनाकडून पुरवण्यात येत आहे. लोकसंख्या वाढल्यामुळे वाढीव बांधकाम झाले; परंतु त्यानुसार मलनिःसारण वाहिन्या, पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या, वाहनतळ आदी सुविधांमध्ये फारसे बदल झाले नाहीत. त्यामुळे सध्या या सुविधांवर ताण येत आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा होणे, वारंवार मलनिःसारण वाहिन्या तुंबणे, वाहने उभी करण्यासाठी जागा अपुरी पडणे अशा समस्यांना सद्यस्थितीत नवी मुंबईकरांना सामोरे जावे लागत आहे. 

सिडकोकालीन इमारतींना एक ते दीड चटईक्षेत्र बांधकामासाठी वापरता येते. सुरुवातीला काही लोकांना वाढीव बांधकाम करण्यासाठी महापालिकेने 2016 पर्यंत परवानग्या दिल्या; मात्र आता एका घरामागे एक पार्किंग व 15 टक्के मोकळी जागा उच्च न्यायालयाने अनिवार्य केल्यामुळे वाढीव बांधकामांना परवानगी देता येत नाही. 
- ओवेस मोमीन, उपसंचालक,  नगररचना विभाग, नवी मुंबई महापालिका 

Web Title: Unauthorized construction is being done in Navi Mumbai

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com