मी विधानसभा लढणार; मतदारसंघ पक्ष ठरवेल : रोहित पवार

मी विधानसभा लढणार; मतदारसंघ पक्ष ठरवेल : रोहित पवार

पुणे : व्यवसायिक कामातून समाजात माझा जनसंपर्क निर्माण झाला आहे. सामान्य जनतेशी नाळ जोडली गेली आहे. त्यामुळे मी विधानसभेची निवडणूक लढणार असून, माझा मतदारसंघ कोणता असेल हे पक्षाचे नेते ठरवतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी आज स्पष्ट केले. 

गेल्या काही महिन्यांपासून रोहित पवार हे कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यांनी या भागात स्वतःचा जनसंपर्कही वाढवला असून, लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. तसेच ते हडपसर विधानसभेतूनही निवडणूक लढवतील अशीही चर्चा सुरू आहे. 

दरम्यान पुण्यात पत्रकारांशी बोलताना रोहित पवार याबाबत म्हणाले, लोकांशी चर्चा केल्यानंतर लक्षात येते की गेले 12 वर्ष मी व्यावसाय करताना सामान्य नागरिकांशी माझी नाळ जोडली गेलेली आहे. काम करताना माझा सामाजाचा अभ्यासही चांगला झालेला आहे. त्यामुळे विधानसभा लढण्याचा माझा विचार आहे. मी कुठून लढणार याचा निर्णय पक्षाचे नेते चर्चा करून त्याचा निर्णय घेतील. हा निर्णय मला मान्य असेल. मी पवार साहेबांच्या विचाराने काम करतो, त्यामुळे जामखेड भागातून आपल्याच विचाराचा आमदार निवडून आला पाहिजे. या भागातील शेती, महिला, तरुणांचे प्रश्‍न या भागातून निवडून येणार आमदार निश्‍चीत सोडवेल. 

नियोजन न केल्याने पाण्याचा प्रश्‍न 
पाण्यावरून शहरी आणि ग्रामीण असा वाद नाही. सध्याच्या सरकारमधील पालकमंत्री, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी व्यवस्थित नियोजन न केल्याने पाणी कमी पडत आहे. व्यवस्थित नियोजन असते तर ही स्थिती निर्माण झाली नसती. पाणी वापराबाबत प्रबोधन केले तर पुणेकर आणखी योग्य प्रकारे पाणी वापरतील असेही पवार यांनी सांगितले. 

पाच वर्षात पार्थ काय बदल करतील याचा विचार करा 
मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांना मार्गदर्शन केले नाही का? असे विचारले असता पवार म्हणाले, पार्थ यांना 22 लाख मतदारांपर्यंत पोहोचायचे होते आणि मी वेगवेगळ्या तालुक्‍यांमध्ये फिरत होतो. आमची चर्चा नक्‍कीच होत असते, एकमेकांचे विषय समजून घेत असतो. पार्थ चांगल्या मतांनी निवडून येतील. सुरूवातीला पार्थ यांना काही लोकांनी ट्रोल केले, पण त्यांचे सुरूवातीचे भाषण आणि शेवटचे भाषण यात फरक आहे. या 20 दिवसात त्यांच्यात बदल केला. तर पाच वर्षात पार्थ या परिसराचा काय बदल करतील याचा तुम्ही विचार करा असेही पवार म्हणाले. 

Web Title: marathi news NCP leader rohit pawar on contesting vidhansabha elections 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com