अनपेक्षित निकालानंतर कॉंग्रेसचे मुख्यालय शांत 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 24 मे 2019

नवी दिल्ली : अनपेक्षित निकालानंतर मनोधैर्य खचलेले मोजके कार्यकर्ते आणि वृत्तवाहिन्यांवर कॉंग्रेसची बाजू मांडण्यासाठी केविलवाणी धडपड करणारे प्रवक्ते यांचा अपवाद वगळता कॉंग्रेसचे '24 अकबर रोड' हे मुख्यालय लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर अक्षरशः भयाण शांततेत बुडाल्याचे दिसून आले. 

नवी दिल्ली : अनपेक्षित निकालानंतर मनोधैर्य खचलेले मोजके कार्यकर्ते आणि वृत्तवाहिन्यांवर कॉंग्रेसची बाजू मांडण्यासाठी केविलवाणी धडपड करणारे प्रवक्ते यांचा अपवाद वगळता कॉंग्रेसचे '24 अकबर रोड' हे मुख्यालय लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर अक्षरशः भयाण शांततेत बुडाल्याचे दिसून आले. 

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंत कार्यकर्त्यांचा वावर ओसरल्यामुळे सन्नाटा जाणवणाऱ्या कॉंग्रेस मुख्यालयात पक्षाध्यक्ष राहुल गांधींचे आगमन होईपर्यंत अन्य बड्या नेत्यांनीही येण्याचे टाळले. नेहमीप्रमाणे अपवाद होता ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा यांचा. नेते, कार्यकर्त्यांपेक्षा वार्तांकनासाठी जमलेल्या वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधी, कॅमेरामनचीच संख्या मुख्यालयात अधिक होती. 

कॉंग्रेसच्या दारुण पराभवानंतरही वृत्तवाहिन्यांवर भाजपच्या धोरणांवर तुटून पडणारे प्रवक्ते खासगीत बोलताना मात्र पुरते निराश झाले होते. भाजपच्या बालाकोट हल्ल्यावरील प्रचाराबद्दलची "मोदींनी घरात घुसून मारले आणि आमचे नुकसान केले,' ही एका प्रवक्‍त्याची खासगीतली टिप्पणी; तर संपूर्ण पाच वर्षांत भाजपच्या पराभवासाठी आणि संघटनेची ताकद वाढविण्यासाठी काहीही नियोजन झाले नाही, अशी दुसऱ्या एका प्रवक्‍त्याची प्रतिक्रिया कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त करणारी होती. या निकालांनंतर राहुल गांधी प्रसार माध्यमांना सामोरे जाणार की नाही, याबाबत मुख्यालयात स्पष्टता नव्हती. 

अखेर पाचच्या सुमारास राहुल गांधी पत्रकार परिषद घेतील, असे स्पष्ट झाल्यानंतर अन्य नेतेमंडळींचा वावार सुरू झाला. मात्र, केवळ मोदी आणि भाजपचे अभिनंदन करण्यासाठी झालेल्या या पत्रकार परिषदेनंतर पुन्हा मुख्यालयात जैसे थे वातावरण होताच, कार्यकर्ते आणि माध्यम प्रतिनिधींमध्ये "अकबर रोड'वर कॉंग्रेसचे मुख्यालय आणखी किती काळ राहणार, याबद्दलची चर्चा रंगली होती.

Web Title : After the unexpected result, the Congress headquarters are quiet


संबंधित बातम्या

Saam TV Live