काँग्रेसकडून लोकसभेतील गटनेत्याचे नाव अद्याप स्पष्ट नाही

काँग्रेसकडून लोकसभेतील गटनेत्याचे नाव अद्याप स्पष्ट नाही

नवी दिल्ली : १७ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली असली, तरी अद्याप सभागृहातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसकडून गटनेत्याच्या नावाची घोषणा झालेली नाही. लोकसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागलेला काँग्रेस पक्ष अजून त्या मानसिक स्थितीतून बाहेर पडल्याचे दिसत नाही. पक्षामध्ये अंतर्गत पातळीवर गोंधळाचे वातावरण असल्याचेही या निमित्ताने दिसून येते.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सोमवारी लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेणार की नाही, यावरूनही सुरुवातीला गोंधळ होता. पण नंतर खुद्द राहुल गांधी यांनी ट्विट करून आपण आजच शपथ घेणार असल्याचे जाहीर केले. सभागृहात शपथ घेतल्यानंतर राहुल गांधी स्वाक्षरी करायला विसरले आणि ते तसेच निघून जाऊ लागले. त्यानंतर राहुल गांधी यांना स्वाक्षरी करण्यासाठी पुन्हा बोलावण्यात आले.

लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस कार्यकारिणीने त्यांचा राजीनामा फेटाळला असला, तरी अद्याप राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम आहेत. राहुल गांधीच काँग्रेस अध्यक्षपदावर कायम राहतील, असे पक्षाकडून सध्या तरी स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता या पदासाठी राखीव असलेल्या जागेवर सोमवारी राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यांच्यापैकी कोणीही बसले नाही. लोकसभेतील विरोधी पक्षनेता या पदावर दावा करण्यासाठी आवश्यक संख्याबळ काँग्रेसकडे सध्या नाही. ज्या विरोधी पक्षाकडे लोकसभेत ५५ जागा असतात, त्यालाच या पदावर दावा करता येतो. 

काँग्रेसच्या काही नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभेतील गटनेता या पदासाठी काँग्रेसकडून केरळमधील खासदार के सुरेश, मनिष तिवारी किंवा शशी थरूर यांच्यापैकी एकाचा विचार केला जाऊ शकतो.

Web Title : The name of Congress leader from the Leader of the House is not clear yet

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com