लोकसभेमध्ये धार्मिक घोषणा देण्याला कधीच परवानगी देण्यात येणार नाही : ओम बिर्ला

लोकसभेमध्ये धार्मिक घोषणा देण्याला कधीच परवानगी देण्यात येणार नाही : ओम बिर्ला

नवी दिल्ली : लोकसभेमध्ये धार्मिक घोषणा देण्याला कधीच परवानगी देण्यात येणार नाही. त्याचबरोबर विरोधी पक्षांतील सदस्यांची टिंगलटवाळीही खपवून घेतली जाणार नाही, असे लोकसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ओम बिर्ला यांनी 'हिंदूस्थान टाइम्स'शी बोलताना स्पष्ट केले. गेले दोन दिवस लोकसभेचे नवनिर्वाचित सदस्य शपथ ग्रहण करीत असताना काही सदस्यांकडून 'जय श्रीराम' अशा घोषणा देण्यात येत होत्या. त्याच बरोबर काही विरोधी पक्षांतील सदस्य शपथ घेताना त्यांच्यावर उपरोधिक टीकाही केली जात होती. या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला ओम बिर्ला यांनी वरील उत्तर दिले.

सत्ताधारी बाकांवरील काही सदस्यांकडून विरोधी पक्षांतील सोनिया गांधी, असदुद्दीन ओवैसी आणि तृणमूल काँग्रेसचे सदस्य शपथ ग्रहण करीत असताना करण्यात आलेली विधाने सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्याचा लोकसभेचे हंगामी अध्यक्ष वीरेंद्र कुमार यांचा निर्णय योग्यच असल्याचे ओम बिर्ला यांनी म्हटले आहे. 

सत्ताधारी बाकांवरील सदस्यांकडून धार्मिक घोषणा दिल्या जाऊ लागल्यानंतर विरोधी बाकांवरील सदस्यांकडूनही त्यांच्या घोषणा देण्यात येऊ लागल्या होत्या. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ओम बिर्ला म्हणाले, संसद हे घोषणाबाजीचे, फलक दाखविण्याचे किंवा वेलमध्ये येऊन गोंधळ घालण्याचे स्थान नाही. या गोष्टी करण्यासाठी इतर जागा उपलब्ध आहेत. सभागृहातील सदस्यांना जी मते मांडायची आहेत, सरकारवर जी टीका करायची आहे ती करण्यासाठी ते मुक्त आहेत. पण ते वेलमध्ये येऊन गोंधळ घालू शकत नाही. आपल्या जागेवरूनच त्यांना आपली भूमिका मांडावी लागेल.

लोकसभेमध्ये धार्मिक स्वरुपाची घोषणाबाजी पुन्हा होणार नाही, याची तुम्ही हमी देऊ शकता का, या प्रश्नावर उत्तर देताना ओम बिर्ला म्हणाले, सभागृहात पुन्हा असे होणार की नाही हे मला माहिती नाही. पण मी नियमानुसार सभागृह चालविणार. जय श्रीराम, जय भारत, वंदे मातरम या घोषणा सभागृहातील जुनाच मुद्दा आहे. पण या घोषणा कोणत्या संदर्भातून दिल्या जात आहेत, हे बघितले गेले पाहिजे. त्या कामकाजात ठेवायच्या की काढायच्या याचा निर्णय त्यावेळी अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसलेली व्यक्तीच घेऊ शकते.

Web Title : Will not be allowed to make religious announcements in the Lok Sabha: Om Birla

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com