सुरक्षारक्षकांचा ‘मैं चौकीदार नहीं’ या थाटात वावर

सुरक्षारक्षकांचा ‘मैं चौकीदार नहीं’ या थाटात वावर

पुणे -  लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून भाजपच्या ‘मैं भी चौकीदार’, तर काँग्रेसच्या ‘चौकीदार चोर है’ या घोषणांवरून वादळ उठले आहे. शहरात मात्र चौकीदार गायब असल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या इमारती, शाळा, दवाखाने, गोदामे आणि ‘पीएमपी’च्या सुरक्षिततेसाठी नेमलेल्या सुरक्षारक्षकांपैकी २५ टक्के सुरक्षारक्षक ‘मैं चौकीदार नहीं’ या थाटात वावरत असल्याचे समोर आले आहे. 

नगरसेवक, ठेकेदारांच्या नावाचा धाक दाखवून ही मंडळी केवळ सह्यांपुरतीच हजेरी लावत असल्याचे प्रत्यक्ष पाहणीतून दिसून आले. तरीही अशा सुरक्षारक्षकांना महिन्याकाठी पूर्ण पगार मिळत आहे. 

महापालिकेच्या दाव्यानुसार सुरक्षारक्षकांची नेमणूक केली आहे, अशा ठिकाणांची गेले दोन दिवस प्रत्यक्ष पाहणी केली. तेव्हा बहुतेक ठिकाणी सुरक्षारक्षक भलतीच कामे करीत होते. काही जण अन्य कामांसाठी आताच बाहेर गेल्याची कारणे देण्यात आली. ठराविक सुरक्षारक्षक तर केवळ सही करण्यापुरतेच येत असल्याचे काही सुरक्षारक्षकांनीच सांगितले. महापालिका मुख्य इमारतीसह, शिक्षण मंडळ, पाणीपुरवठा, आरोग्य, उद्यान, आग्निशामक आदी विभागांच्या मिळकतींमध्ये सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहे. या ठिकाणी २४ सुरक्षारक्षक बंधनकारक आहेत. त्यापैकी तळजाई पठार, कोथरूडमधील दवाखाने, उद्याने, अग्निशामक केंद्र, शाळांच्या परिसरांत एकही सुरक्षारक्षक नव्हता. महापालिका आणि शिक्षण मंडळाच्या मुख्य कार्यालयाच्या आवारात नेमणुकीच्या तुलनेत निम्मेच सुरक्षारक्षक आढळून आले. 

या साऱ्या बाबींची पुरेपूर कल्पना असलेला महापालिकेचा सुरक्षा विभाग अशा सुरक्षारक्षकांना पाठीशी घालत आहे. वेळापत्रकानुसार सुरक्षारक्षक आहेत का, याची विचारणा सुरक्षा अधिकाऱ्यांकडे केली. त्यावर त्यांचे उत्तर मिळाले, ‘जे दांडी मारतात त्यांच्यावर लगेचच कारवाई होते.’ मग कामावर नसलेल्या तक्रारी किती आणि त्यांच्यावर कारवाई काय केली, हे सांगणे त्यांनी टाळले. 

कायम सेवेतील कोणालाच जुमानेत 
महापालिकेकडे सध्या सुमारे पावणेदोन हजार सुरक्षारक्षक आहेत. त्यात कामयस्वरूपी साडेचारशे, तर १ हजार ३५० सुरक्षारक्षक कंत्राटी आहेत. कंत्राटी सुरक्षारक्षक हे ठेकेदाराच्या माध्यमातून घेण्यात आले आहेत. आवश्‍यकता नसतानाही त्यांची भरती केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर काही महिने या सुरक्षारक्षकांना पगारही मिळाला नव्हता. तो वाद आता मिटला आहे. या पार्श्‍वभूमीवर नोकरीच्या जाण्याच्या भीतीने कंत्राटी सुरक्षारक्षक वेळेत कामावर येत असल्याचे त्यांच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे. मात्र कायमस्वरूपी सेवेत असलेले सुरक्षारक्षक कोणालाही जुमनत नसल्याची तक्रार आहे.  

महापालिकेच्या मिळकतींसह सुरक्षिततेसाठी सुरक्षारक्षकांची नेमणूक केली आहे. त्यांच्यासाठी कामाचे वेळापत्रक असून, त्याप्रमाणे त्यांनी गणवेशात हजर राहणे बंधनकारक आहे. सुरक्षारक्षक हजर असल्याची पाहणी होते. ते हजर नसल्यास त्यांच्यावर कारवाई होते. 
- माधव जगताप, प्रमुख, सुरक्षा विभाग, महापालिका

Web Title: No chowkidar in pune deputy registrar Birth and Death Registration Office

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com