पंचगंगा परिक्रमा २४ मे पासून

पंचगंगा परिक्रमा २४ मे पासून

कोल्हापूर - नर्मदा आणि गंगा नदीच्या परिक्रमासारखीच पंचगंगा नदीची परिक्रमा पावसाळ्यानंतर सुरू केली जाणार आहे. गुरुवार (ता. २४) पंचगंगेची पूजा आणि आरती करून परिक्रमेची सुरवात केली जाणार असून, यामध्ये जिल्ह्यातील इच्छुकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन आमदार अमल महाडिक आणि जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी  केले. येथील हॉटेल पॅव्हेलियनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आमदार महाडिक म्हणाले, ‘‘नमामि पंचगंगे’ ही संकल्पना घेऊन पंचगंगा परिक्रमा करणार आहोत. पंचगंगेच्या उगमापासून ते संगमापर्यंत पंचगंगा ही पवित्र आहे. त्यामुळेच पंचगंगा स्मरेनित्यम हे बोधवाक्‍य घेऊन परिक्रमा सुरू होईल. याचा सुनियोजित आराखडा तयार केला आहे. जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण संस्कृतीचे प्रत्यक्ष दर्शन लोकांना घडले पाहिजे. यासाठीही जनजागृती केली जाणार आहे.’’

 ‘‘पंचगंगेच्या निर्मितीचा इतिहास, प्राचीन उल्लेख, लोककथा, धार्मिक परंपरा, भौगोलिक माहिती, प्रवाह मार्गातील मंदिरे, मठ, आश्रम, गावे, वनस्पती, पिके, पशुपक्षी, पर्यावरण, पुरवाशेष आदीबाबत सखोल ज्ञान या परिक्रमातून करणार आहेत.’’

- शौमिका महाडिक

इतिहास अभ्यासक उमाकांत राणिंगा,  प्रसन्न मालेकर, शशिन कुंभोजकर आदी उपस्थित होते.

अशी होणार परिक्रमा
संत-शासन-समाज या त्रिसूत्रीतून पंचगंगेची परिक्रमा केली जाईल. यामध्ये प्रदूषणमुक्तीचा प्रचार, प्रसार आणि प्रबोधन केले जाणार आहे. समाजकार्य करणाऱ्या संस्थांना बरोबर घेऊन उपक्रम राबविला जाईल. पूजा-परंपरा, परिक्रमा, पर्यावरण आणि पर्यटन या पाच विचार प्रवाहांची साथ लाभल्यास पंचगंगेला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षाही शौमिका यांनी व्यक्त केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com