BLOG - शिवसेना पुन्‍हा फुटीच्‍या उंबरठ्यावर ? 

BLOG - शिवसेना पुन्‍हा फुटीच्‍या उंबरठ्यावर ? 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्‍वबळाचा नारा देत राज्‍यात शिवसेनेचा मुख्‍यमंत्री निवडून आणण्‍याचा निर्धार केला आहे. पण या निर्धाराला स्‍वपक्षातूनच सुरुंग लागण्‍याची शक्‍यता बळावलीय. पक्षातल्‍या आमदारांचा एक गट उद्धव ठाकरेंच्‍या मताशी शंभर टक्‍के सहमत आहे, तर दुसरा गट भाजपची साथ सोडू नये, असं म्‍हणणारा आहे. या दोन मतांची सांगड घालणं उद्धव ठाकरेंसाठी डोकेदुखी ठरणार, हे नक्‍की.  '

शिवसेनेत फक्‍त ज्‍येष्‍ठांनाच संधी ? 

शिवसेनेत तरुण आमदारांची संख्‍या मोठी आहे. पण त्‍यांना फारसं महत्‍व दिलं जात नाही, अशीच त्‍यांची भावना आहे. या भावनेतूनच शिवसेनेतेला एक गट खदखदतोय. ही खदखद दूर करण्‍याऐवजी तिला प्रत्‍यक्ष- अप्रत्‍यक्षपणे खतपाणी घालण्‍याचंच काम शिवसेनेच्‍या नेतृत्‍वाकडून होत आहे, असंच या तरुणाईचं मत बनत चाललंय. एकीकडं फक्‍त   म्‍हाता-यांनाच मानपान आणि मंत्रिमंडळात संधी दिली जात असल्‍याची बळकट होत चाललेली भावना सेनेतल्‍या तरुणाईला सतावत आहे. अशातच उद्धव ठाकरेंनी एकला चलो रे चा नारा दिला. आणि यामुळं अनेकांना आपण पुन्‍हा निवडून येऊ की नाही, अशी भीती वाटायला लागली. या भीतीपोटीच उद्धव ठाकरेंवर युती करण्‍याबाबतचा दबाव वाढवण्‍याचे प्रयत्‍न सुरु झाले. 

सेनेतल्‍या 'त्‍या' लोकांना भाजपची फूस ?

शिवसेना युती न करता सवतंत्र लढण्‍याच्‍या निर्णयावर ठाम राहिली, त त्‍याचा फटका आपल्‍यालाही बसू शकतो, याची जाणीव भाजपलाही झाली आहे. या जाणीवेतूनच उद्धव ठाकरेंनी स्‍वतंत्रपणे लढण्‍याची वारंवार घोषणा केल्‍यानंतरही भाजपकडून मात्र शिवसेनेच्‍या मनधरणीचे प्रयत्‍न सुरु असल्‍याचं पाहायला मिळतंय. या प्रयत्‍नांना यश मिळण्‍याची शक्‍यता दुरावल्‍यानंच कधी कॉंग्रेस-राष्‍ट्रवादीची सत्ता येण्‍याची भीती दाखवण्‍याचे उद्योग भाजपकडून सुरु झालेत. सेनेचं नेतृत्‍व या भीतीला जुमानत नसल्‍याचं स्‍पष्‍ट झाल्‍यानंतर आता भाजपकडून सेनेतल्‍या असंतुष्‍टांना गोंजारण्‍याचे प्रयत्‍न सुरु झाल्‍याची चर्चा सेनेच्‍या वर्तुळातून ऐकायला मिळतेय.

असंतुष्‍ट गट मुख्‍यमंत्र्यांच्‍या संपर्कात ? 

भाजपबरोबरची युती तोडू नये, असं म्‍हणणारा गट शिवसेनेत प्रभावी नसला, तरी मोठा असल्‍याचं सांगण्‍यात येत आहे. त्‍यामुळं या गटाची लवकरात लवकर समजूत काढणं गरजेचं आहे. हाच गट मुख्‍यमंत्र्यांच्‍याही संपर्कात असल्‍याची कुजबूज शिवसेनेतूनच ऐकायला मिळतेय. हा गट मुख्‍यमंत्र्यांच्‍या संपर्कात असल्‍यानं तर शिवसेनेला भगदाड पडण्‍याची शक्‍यता बळावली आहे. 

... तर भाजप 'त्‍यांना' दरवाजे उघडे करुन देणारच ! 

तोडफोडीच्‍या राजकारणात मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्‍यांचा भाजप माहीर आहे, हे या चार वर्षाच्‍या काळात वेळोवेळी स्‍पष्‍ट झालंय. त्‍यांनी कॉंग्रेस- राष्‍ट्रवादीला राज्‍यात ठिकठिकाणी भगदाड पाडतच सत्तेचं सोपान गाठलंय. ते टिकवून ठेवण्‍यासाठी भाजप आणि फडणवीस जीवाचं रान करणार, हे वेगळं सांगण्‍याची गरज नाही. मुख्‍यमंत्र्यांनी शिवसेनेचा एकला चलो रे चा नारा गंभीरपणे घेतला, तर ते शिवसेनेच्‍या या असंतुष्‍ट गटाला नक्‍कीच भाजपचे दरवाजे उघडून देणार, याबाबत शंका बाळगण्‍याचं कारण नाही.  


उद्धव ठाकरेंसाठी आता माघार नाही...   

भाजपकडून वारंवार मिळणारी सापत्‍नभावाची वागणूक, अनेकदा टेकिंग ग्रँटेड घेतलं जात असल्‍याची सल आणि आपल्‍याच पक्षाच्‍या मंत्री- आमदारांना विकासकामांमध्‍ये घातला जाणारा खोडा या आणि अशा अनेक कारणांमुळं अखेर उद्धव ठाकरेंनी स्‍वबळ आणि शंभर टक्‍के शिवसेनेची सत्ता असा निर्धार केला. पण उद्धव ठाकरेंचा हा निर्धार पहिल्‍यांदा नव्‍हताच. या आधीही त्‍यांनी अशा गर्जना केल्‍या होत्‍या. मध्‍यतंरीच्‍या काळात तर शिवसेनेचे मंत्री आपले राजीनामे खिशात घेऊन फिरत असल्‍याचे उद्धव ठाकरे वारंवार सांगत होते. पण ते राजीनामे नेमके कशासाठी घेऊन फिरत होते आणि त्‍याचं नेमकं काय झालं, हे उद्धव ठाकरेंना तरी माहिती झालं की नाही, हे कळण्‍यापलिकडचं आहे.     

सेनेला फुटीचा शाप ?  

आपली ताकद वाढत आपण सत्तेच्‍या सोपानापर्यंत पोहोचू शकते, असं जेव्‍हा जेव्‍हा शिवसेनेला वाटू लागतं, तेव्‍हा तेव्‍हा शिवसेना फुटलीय, हा इतिहास आहे. छगन भुजबळ, राज ठाकरे, नारायण राणे ही नावं त्‍या इतिहासाचा भाग बनली आहेत. त्‍यात आता आणखी कोणाची भर पडणार, याचं उत्तर कोण देणार, याची उत्‍सुकता सर्वांनाच असेल.

WebTitle : Marathi News Politics Blog Maharashtra Shivsena  BJP Internal Conflicts 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com