माझ्यासमोर कुणीही उभा राहो "मी शंभर टक्के नव्हे; एक हजार एक टक्के निवडून येईन" - शिवाजीराव आढळराव पाटील

माझ्यासमोर कुणीही उभा राहो "मी शंभर टक्के नव्हे; एक हजार एक टक्के निवडून येईन" - शिवाजीराव आढळराव पाटील

शिरूर - शिरूर लोकसभा मतदारसंघातून उभे राहण्याचे संकेत देत शंभर टक्के निवडून येण्याचा विश्‍वास व्यक्त करणाऱ्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज पलटवार केला. ‘‘माझ्यासमोर कुणीही उभा राहो. मी शंभर टक्के नव्हे; एक हजार एक टक्के निवडून येईल. निवडून नाही आलो; तर मराठ्याची अवलाद सांगणार नाही,’’ असे प्रत्युत्तर त्यांनी दिले. 

शिरूर लोकसभा मतदारसंघातून योग्य उमेदवार मिळत नसेल तर मी येथून लढायला तयार आहे. एकदा उमेदवारीचा फॉर्म भरला; तर मी शंभर टक्के निवडूनच येईल. अन्यथा पवारांची अवलाद सांगणार नाही, असे वक्तव्य करून अजित पवारांनी रविवारी शिरूर मतदारसंघात धुरळा उडवून दिला होता. त्यांच्या वक्तव्यानंतर खळबळ उडाली होती. 

या पार्श्‍वभूमीवर, अजित पवारांच्या या वक्तव्याचा आज खासदार आढळराव पाटील यांनी तेवढ्याच खरपूस शब्दांत समाचार घेतला. ते म्हणाले, ‘‘अजित पवार यांनी जे जाहीर वक्तव्य केले, त्या मताशी त्यांनी ठाम राहावे. त्यांनी या मतदारसंघातून लढण्याचे आव्हान मी स्वीकारीत आहे. त्यांनी येथून निवडणूक लढवूनच दाखवावी. तरच त्यांना मानेल. ते माझ्या विरोधात उभे राहिले; तरी मीच निवडून येणार आणि कुणीही प्रतिस्पर्धी असला तरी विजय माझाच; अन्यथा मराठ्याची अवलाद सांगणार नाही.’’

‘‘लोकसभेच्या सलग तीन निवडणुका मी लढविल्या असून, खेडमधून प्रथम; तर शिरूर मतदारसंघातून सलग दोनवेळा निवडून आलो आहे. त्या प्रत्येक निवडणुकीत मला पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जंग जंग पछाडले. प्रत्येक निवडणुकीत ते वेगवेगळे पर्याय अवलंबत असतात आणि स्वतःचे हसे करून घेत असतात. लोकांचे मतपरिवर्तन करून मला रोखण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनेकदा केला; पण लोक त्यांना बधले नाहीत. अजित पवारांचे वक्तव्य हे त्यांच्या पक्षातील इतर कुणी माझ्याविरोधात उभे राहायला तयार नसल्याचे सांगणारे आहे. त्यामुळे आता खुद्द ते माझ्याविरोधात लढायला तयार झाले असतील; तर आनंदच आहे. त्यांच्याकडे 

योग्य पर्याय नसल्याने पवार कुटुंबीयांपैकी कुणीतरी माझ्याविरोधात येईल, अशी चर्चा होतीच,’’ असे आढळराव म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com