'सावरगावच्या वाघिणी'ची डरकाळी कोणाला घाम फोडणार?

'सावरगावच्या वाघिणी'ची डरकाळी कोणाला घाम फोडणार?

बीड: सुरुवातीलाच 'वाघाच्या पोटी वाघिण जन्माला येते' असे म्हणत पंकजा मुंडे यांनी आपल्या राजकीय विरोधकांना इशारा दिला. तर, आपल्याला कुठल्याही पदाची लालसा नाही, 'त्या' पदावर असलेल्यांना सर्वाधिक पाठबळ आपले आहे, कुणालाही धोक्याची घंटा नसून येथूनच 2019 च्या निवडणुकीत यशाची घंटा वाजणार असे म्हणून त्यांनी पक्षालाही आपल्या ताकदीची जाणिव करुन दिली. 

संत भगवान बाबांची जन्मभूमी असलेल्या सावरगाव घाट येथे पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली दुसरा दसरा मेळावा झाला. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मेळाव्याला गर्दीही जमली. केवळ आपल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून गर्दी जमते हे दाखवून त्यांनी आयत्या जमणाऱ्या गर्दीत मेळावा घेतात ह्या विरोधकांच्या टिकेलाही उत्तर दिले. तर, गर्दीकडे पाहून माझा आवाज ऐकू येतोय का, तुम्हालाही ऐकू येतोय आणि महाराष्ट्र ऐकतोय म्हणत त्यांनी आता राज्यातील प्रमुख दसरा मेळाव्यांत आता पंकजा मुंडेंच्याही मेळाव्याची दखल घ्यावी लागेल असेच त्यांनी सुचित केले. 

वाघाच्या पोटी वाघिनच जन्माला येते असे म्हणून विरोधकांनाही इशारा दिला. मध्यंतरी सर्वेबाबत झालेल्या चर्चा आणि प्रसिद्ध झालेल्या बातम्यांवर ‘काम कसे असावे, सुधारणा काय करायच्या याबाबत आ्ही पक्षांतर्गत केलेली चर्चा होती. पण, मी तसले सर्व्हे - फिर्व्हे मानत नाही.  तुम्ही, माझी माणसं हीच माझा सर्व्हे आहे, इथ येऊन पाहा, आणि ही गर्दी पाहून रक्षा खडसे आणि प्रितम मुंडे यांचा पराभव होत असतो का' असे म्हणून त्यांनी प्रितम मुंडेच उमेदवार असणार हे तर जाहीर करुन टाकलेच. शिवाय काम पाहून नाही तर चेहरे पाहून तिकीट देतात असे सांगत त्यांनी उमेदवारी मिळविण्याची ताकद ठेवून असल्याचेही सुचित केले. गर्दीकडे पाहून ही गर्दी केवळ जिल्ह्यातलीच नसून तुम्ही कुठून कुठून आलात आणि अहमदनगर, नाशिक, पुणे, बुलढाणा, मुंबई अशा विविध जिल्ह्यांचे नाव घेत समोरच्यांना हात वर करायला लाऊन आपले समर्थक आणि ताकद जिल्ह्यातच नसून राज्यभर असल्याचा संदेशही त्यांनी दिला. तर, बीड जिल्ह्यातील समर्थक आमदारांसह दोन मंत्री तसेच अहमदनगर, नाशिक, बुलढाणा, परभणी आदी जिल्ह्यांतील पंधरावर आमदार जमा करुन स्वत:मागील आमदारांचे पाठबळही त्यांनी दाखवून दिले. 

कार्यक्रमाला राजकीय नेत्यांसह संत - महंतांचीही उपस्थिती होती. यातील एकाने ‘ताई मुख्यमंत्री व्हाव्यात’ असे आपल्या भाषणात म्हटले. त्याचा संदर्भ घेत ‘आपल्याला कुठल्याही पदाची लालसा नाही हे शपथेवर सांगण्याबरोबरच ‘त्या’ पदावर बसलेल्या व्यक्तीला सर्वाधिक पाठबळ माझे असेल. या ताकदीच्या (समोरच्या गर्दीच्या) जोरावर मी तुमच्या मनातील विचाराचे सरकार आणणार, दिवंगत गोपीनाथराव मुंडे किंगमेकर होते, त्याच जागी जनतेने मला बसवलं आहे. या त्यांच्या वाक्यातून त्या भाजप सरकारच्या किंगमेकर असणार हेही त्यांनी जाहीर केलं. एकंदरीत मेळाव्याला केवळ आपल्या आवाहनावर गर्दी जमते हे सिद्ध करण्याबरोबरच आपल्या ताकदीची जाणिव आणि इशाराही या निमित्ताने दिला.  

Web Title : marathi news politics pankaja munde sawargav dasara melawa speech 

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com